नैराश्यापासून सुटका – २३
नैराश्यापासून सुटका – २३
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुमची ही अडचण अविश्वास आणि अवज्ञेतूनच आलेली दिसते. कारण अविश्वास आणि अवज्ञा (distrust and disobedience) या गोष्टी मिथ्यत्वासारख्याच असतात. (त्या स्वतःही मिथ्या असतात आणि मिथ्या कल्पना व आवेगांवर आधारित असतात.) त्या ‘ईश्वरी शक्ती’च्या कार्यामध्ये ढवळाढवळ करतात. त्या गोष्टी व्यक्तीला ईश्वरी शक्तीची जाणीव होऊ देत नाहीत; तसेच ईश्वरी शक्तीचे व्यक्तीमध्ये जे कार्य चालू असते ते पूर्ण करण्यामध्ये त्या गोष्टी आडकाठी आणतात आणि त्यांच्यामुळे (तुम्हाला लाभलेली) ईश्वरी संरक्षणाची शक्ती क्षीण होते.
फक्त आंतरिक एकाग्रतेच्या वेळीच नव्हे तर, तुमच्या बाह्य कृती आणि जीवनव्यवहार यांमध्येही तुम्ही योग्य दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही जर तसे केलेत आणि सारेकाही श्रीमाताजींच्या मार्गदर्शनानुसार केलेत तर, अडचणी कमी कमी होत चालल्या आहेत किंवा त्या अधिक सहजतेने सुटत चालल्या आहेत आणि गोष्टी अधिक सुरळीत होत चालल्या आहेत, असे तुम्हाला आढळून येईल.
तुम्ही एकाग्रचित्त होण्याच्या वेळी जे काही करता तेच तुम्ही तुमच्या कर्मामध्ये आणि कृतींमध्येही केले पाहिजे. श्रीमाताजींप्रति खुले व्हा, तुमच्या सर्व कृती त्यांच्या मार्गदर्शनानुसार करा; शांती, साहाय्यक शक्ती, संरक्षण लाभावे यासाठी त्यांना आवाहन करा आणि त्यांना तुमच्यामध्ये कार्य करता यावे म्हणून सर्व चुकीच्या प्रभावांना नकार द्या. (अन्यथा) हे प्रभाव चुकीच्या, निष्काळजी किंवा चेतनारहित गतीविधींद्वारे मार्गामध्ये अडथळा ठरू शकतात. या तत्त्वाचे अनुसरण करा म्हणजे मग तुमचे समग्र अस्तित्व एकसंध होईल आणि मग ते शांती व आश्रयदायी ‘शक्ती’ आणि ‘प्रकाश’ यांच्या एकछत्री अंमलाखाली येईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 143)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६ - November 14, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५ - November 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४ - November 12, 2025






