नैराश्यापासून सुटका – १७
नैराश्यापासून सुटका – १७
प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.
या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६ - November 14, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५ - November 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४ - November 12, 2025





