जीवन जगण्याचे शास्त्र – १९

जीवन जगण्याचे शास्त्र – १९

(पूर्वार्ध)

(श्रीमाताजी येथे मनाच्या आणि प्राणाच्या अविचलतेसंबंधी मार्गदर्शन करत आहेत.)

साधक : माताजी, तुम्ही आम्हाला जेव्हा सांगता की, ‘आम्ही शांतस्थिर असलेच पाहिजे,’ तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो?

श्रीमाताजी : मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘शांतस्थिर (calm) राहा,’ असे सांगते, तेव्हा त्याचे व्यक्तिपरत्वे भिन्नभिन्न अर्थ असतात. परंतु पहिली अगदी आवश्यक असणारी स्थिरशांती म्हणजे मानसिक अविचलता (mental quietude). कारण सहसा व्यक्तीमध्ये त्याचाच अभाव असतो. मी जेव्हा ‘शांतस्थिर राहा,’ असे सांगते, तेव्हा मला असे म्हणायचे असते की, तुमचे विचार अस्वस्थ, उत्तेजित, प्रक्षुब्ध असता कामा नयेत. तुम्ही तुमचे मन अविचल (quiet) करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तुमच्या कल्पना, तुमची निरीक्षणे, तुमच्या मानसिक रचना यांच्या भोवती घुटमळणे तुम्ही थांबविले पाहिजे.

आता कोणी मला आणखी एक असा प्रश्न विचारेल की, “तुम्ही आम्हाला शांतस्थिर राहायला सांगता, पण आम्ही त्यासाठी काय केले पाहिजे?” त्याचे उत्तर कमीअधिक प्रमाणात नेहमी एकसारखेच असते. ते म्हणजे, प्रथम तुम्हाला त्याची गरज वाटली पाहिजे आणि तशी गरज भासल्यानंतर, तुम्ही त्यासाठी आस बाळगली पाहिजे आणि मग त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी आजवर अनेकांनी अगणित पद्धती सुचविलेल्या आणि अवलंबलेल्या आहेत. बहुधा या पद्धती नेहमीच दीर्घकालीन, कष्टसाध्य आणि कठीण असतात. आणि बहुधा बरेचसे लोक त्यांच्या ध्येयाप्रत पोहोचण्यापूर्वीच नाउमेद होऊन जातात. कारण ते जितका जास्त प्रयत्न करू लागतात तेवढे त्यांच्या डोक्यात अधिकाधिक विचार घोळू लागतात आणि त्या विचारांचे काहूर त्यांच्या मनात उठते.

प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी पद्धत असते; परंतु प्रथम व्यक्तीला शांतस्थिर राहण्याची गरज भासली पाहिजे, मग त्यासाठीचे कारण कोणतेही का असेना. म्हणजे एखादी व्यक्ती थकलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने खूप ताणतणाव सहन केलेला असेल म्हणून तिला अशी आवश्यकता जाणवत असेल; किंवा एखादी व्यक्ती अशीही असू शकेल की, जिला तिच्या सद्यस्थितीतील जीवनाच्या पलीकडे उन्नत होण्याची खरोखरच इच्छा असेल; आणि म्हणून तिला तशी आवश्यकता जाणवत असेल. कारण कोणतेही असले तरीही व्यक्तीला त्या स्थिरशांतीची, त्या मन:शांतीची गरज वाटली पाहिजे. आणि मग, योग्य तो परिणाम साध्य करून घेण्यासाठी, व्यक्ती सर्व रूढ आणि त्याचप्रमाणे नवीन पद्धतींचा एकापाठोपाठ एक अवलंब करू शकते.

असे केल्यावर व्यक्तीला लगेचच असे जाणवते की, आणखी एका अविचलतेची आवश्यकता आहे आणि इतकेच नव्हे तर ती त्वरेने अंमलात आणणे गरजेचे आहे. ही अविचलता म्हणजे ‘प्राणिक अविचलता’ (vital quietude)! म्हणजे येथे इच्छावासनांचा निरास झालेला असणे आवश्यक असते. जेव्हा प्राण पुरेसा विकसित झालेला नसतो, तेव्हा जर त्याला शांत बसण्यास सांगण्यात आले तर तो लगेचच एकतर झोपी जातो किंवा मग तो संप पुकारतो. आणि म्हणतो, “ते काही नाही. असे अजिबात चालणार नाही. मी आता इथून पुढे कामच करणार नाही. तुम्ही मला आवश्यक असणारे पोषण, उत्तेजकता, उत्साह, इच्छा, आवेग या गोष्टी पुरविल्या नाहीत तर मी जागचा हलणार नाही आणि आता इथून पुढे मी काहीच करणार नाही.” आणि त्यामुळे समस्या अधिकच नाजूक आणि कदाचित अधिक अवघड होऊन बसते. कारण, क्षुब्धतेमधून जडत्वामध्ये जाऊन पडणे म्हणजे नक्कीच प्रगतीपासून खूप खूप दूर जाणेच असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 08 : 328-329)

श्रीमाताजी