आत्मसाक्षात्कार – १७

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

श्रीमाताजी