आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)

आत्मसाक्षात्कार – १४

(अहंची आवश्यकता का असते ते कालच्या भागात आपण पाहिले. आता व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व निर्माण झाल्यावर काय होते त्याबद्दल आणि अहंच्या विलीनीकरणाबद्दल त्या येथे सांगत आहेत.
या मालिकेतील भाग ०८ ते १४ सलग वाचल्यास हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, असे वाटते.)

तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाला आहात आणि आता योग्य वेळ आली आहे, असे ईश्वराला जेव्हा वाटते, तेव्हा मग ईश्वर तुमचा अहं त्याच्यामध्ये विलीन करण्याची आणि इथून पुढचे तुमचे सर्व जीवन केवळ ईश्वरासाठी व्यतीत करण्याची तुम्हाला अनुमती देतो. हा निर्णय ईश्वर घेत असतो. मात्र त्याआधी तुम्ही हे सगळे काम पूर्ण केले पाहिजे, तुम्ही स्वतः आधी एक सचेत व्यक्ती बनले पाहिजे. तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही पूर्णपणे, अगदी अनन्यपणे केवळ ईश्वराभोवतीच केंद्रीकरण केले पाहिजे आणि ईश्वर हाच तुमचा चालविता धनी असला पाहिजे. पण एवढे सगळे झाल्यावरही, अहं शिल्लक असतोच. कारण त्या अहंनेच तर आजवर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेले असते.

परंतु एकदा का (स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण होण्याचे) ते काम पूर्ण झाले, ते निर्दोष, परिपूर्ण झाले की मग, त्या क्षणी तुम्ही ईश्वराला म्हणू शकता की, “हा मी इथे उभा आहे, मी तयार आहे. माझा तू स्वीकार करशील का?” आणि तेव्हा ईश्वर बहुधा नेहमीच ‘हो’ म्हणतो. तेव्हा सारे काही पूर्ण झालेले असते, सारे काही सिद्धीस गेलेले असते. आणि अशा वेळी मग तुम्ही ईश्वरी कार्य करण्यासाठी ‘खरे साधन’ बनलेले असता.

(सारांश : सरमिसळ अशा सामूहिक अस्तित्वामधून, अहंच्या सहाय्याने व्यक्तीची स्वतंत्र, पृथगात्म अशी घडण – व्यक्तीच्या सर्व घटकांचे ईश्वराभोवती केंद्रीकरण – ईश्वराप्रत आत्मदान – अहंचा विलय करण्यास ईश्वराची अनुमती – अहंचा विलय – आणि व्यक्ती ईश्वरी कार्याचे साधन बनते.)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260-261)

आत्मसाक्षात्कार – १३

(मनाच्या पृथगात्मतेविषयी (individualised) श्रीमाताजींनी काय सांगितले होते ते आपण काल पाहिले. अहंची आवश्यकता काय असते, हे त्या आता समजावून सांगत आहेत.)

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करण्यापूर्वी आपण काय आहोत, हे आधी व्यक्तीने थोडेतरी जाणून घेतले पाहिजे. व्यक्तीमध्ये अहंकार असतो. तुम्ही जागृत, स्वतंत्र, पृथगात्म (individual) व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी अहं आवश्यक असतो. म्हणजे पृथगात्मकतेची जाणीव आवश्यक असते, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जिथे सर्व गोष्टी एकमेकांवर येऊन आदळतात असा एखादा चव्हाटा तुम्ही असता कामा नये. तुमचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे आणि त्यासाठी अहं आवश्यक असतो.

…नंतर, व्यक्ती हे सारे काही ईश्वराला अर्पण करते. पण त्यापूर्वी अनेक वर्षं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्ही केवळ, स्वतःविषयी, अगदी प्रत्येक तपशिलामध्ये शिरून सचेत होणे एवढेच पुरेसे नसते, तर तुम्ही ज्याला ‘अहं, मी’ असे संबोधता त्याचे तुमच्या चैत्य केंद्राभोवती (psychic centre), म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या दिव्य केंद्राभोवती संघटन करावे लागते, जेणेकरून, तुमचे एकच एक, एकसंध असे, सुसंगत, पूर्णपणे जागृत असे व्यक्तित्व तयार होईल.

आणि हे दिव्य केंद्र आधीपासून ईश्वराशी पूर्णतया समर्पित असल्याने, (श्रीमाताजी अर्पण केल्याप्रमाणे हातांची ओंजळ करून दाखवितात.) त्याभोवती जर प्रत्येक गोष्टीची सुव्यवस्थित बांधणी झाली असेल तर, आपोआपच ती प्रत्येक गोष्ट ईश्वराप्रत समर्पित होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260)

आत्मसाक्षात्कार – १२

(प्राणाच्या पृथगात्मतेविषयीचा (individualised) विचार आपण काल केला. आज आपण मनाच्या पृथगात्मतेविषयी श्रीमाताजी काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्हाला जर स्वयमेव तुमच्या शारीर-मनाची (physical mind) जाणीव झाली तर… बरेच जणं त्याला ‘चव्हाटा’ (public square) असे संबोधतात, कारण तेथे प्रत्येक गोष्ट असते, तेथून प्रत्येक गोष्ट जात असते, पुन्हा परतून येत असते… सर्व संकल्पना तेथे (मनामध्ये) जातात, त्या एका जागी प्रवेश करतात, दुसरीकडून बाहेर पडतात. काही इथे असतात, काही तिथे असतात. अशा रितीने मन म्हणजे जणू एक चव्हाटाच असतो. त्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नसते आणि त्यामुळे बहुधा संकल्पना तिथे एकत्र येतात, एकमेकांवर आदळतात आणि मग सर्व तऱ्हेचे गोंधळ उडतात.

परंतु मग कधीतरी एखाद्या दिवशी व्यक्ती सजग होते आणि विचार करू लागते की, ‘माझं मन’ असे मी कशाला बरं म्हणू शकेन? किंवा ‘माझं मन’ म्हणजे काय? व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने विचार करायलादेखील अनेक वर्षं लागतात. ही एक साधीशी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षं सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी सयुक्तिक, अतिशय सुसंगत असे काम करावे लागते; सुव्यवस्था लावावी लागते, निवड करावी लागते, घडण करावी लागते. व्यक्तीला असे वाटत असते की, माझी माझी स्वतःची अशी एक विचारसरणी आहे, पण असे अजिबात नसते.

व्यक्ती ज्या लोकांशी संवाद साधत असते, ती जी पुस्तके वाचत असते आणि तिची जी काही मनोवस्था (mood) असते त्यावर ती पूर्णतः अवलंबून असते. तुमचे पचन व्यवस्थित झाले आहे की तुम्हाला अपचन झाले आहे; खुली हवा नसलेल्या एका खोलीत तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे की, तुम्ही स्वच्छ मोकळ्या हवेत आहात; तुमच्या नजरेसमोर एखादे सुंदर दृश्य आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की पाऊस पडत आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुमचे त्या त्या वेळचे विचार अवलंबून असतात. आणि तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा नसते. तुमच्याशी संबद्ध नसलेल्या, पूर्णपणे असंबद्ध अशा ढिगभर गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता. मात्र एक सुव्यवस्थित, सुसंगत, तर्कसंगत विचारसरणी तयार होण्यासाठी बारकाईने तपशिलवार, प्रदीर्घ काम करण्याची आवश्यकता असते.

यामधील गमतीचा भाग असा की, जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेची एक सुंदर, सुरचित, सशक्त, शक्तिशाली मानसिक रचना घडविण्यामध्ये यशस्वी होता, नेमकी तेव्हाच तुम्हाला पहिली गोष्ट सांगण्यात येते ती अशी की, “तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पावण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर, या सर्व मानसिक रचना तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत.” (अर्थात हेही तितकेच सत्य आहे की,) जोपर्यंत तुम्ही ती रचना घडवलेली नसते, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एकरूपही होऊ शकत नाही कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे नुसता एक वस्तुंचा ढिगारा असता, तुम्ही ‘तुम्ही’ नसता आणि त्यामुळे त्या वस्तुंच्या ढिगाऱ्याखेरीज ईश्वराला देण्यासारखे तुमच्यापाशी काहीच नसते. आत्मदान करता येण्यापूर्वी व्यक्ती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे. मी (प्राणाबाबतीत) जे सांगितले तेच मी आत्ता पुन्हा येथे (मनाबाबत) सांगितले. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258-259)

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०९

(व्यक्तीचे जेव्हा स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व निर्माण झालेले नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते हे आपण कालच्या भागात पाहिले. येथे आता श्रीमाताजी पृथगात्म अस्तित्व (individualised being) म्हणजे काय ते समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीला एखाद्या दिवशी अमुक एक गोष्ट हवी असते तर दुसऱ्याच दिवशी दुसरेच काहीतरी हवे असते. व्यक्ती एका क्षणी या बाजूला तर दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूला ढकलल्यासारखी होत असते. आत्ता व्यक्ती आकाशाकडे पाहत असते (आशावादी असते) तर दुसऱ्या क्षणी जणू ती खाली खोलवर कोठेतरी एका खड्ड्यात जाऊन पडलेली असते (निराशेच्या गर्तेत पडलेली असते). व्यक्तीचे अस्तित्व अशा प्रकारचे असते.

सर्वप्रथम व्यक्तीची सचेत, व्यवस्थित घडण झालेली असली पाहिजे, व्यक्तीला स्वत:चे स्वतंत्र असे, पृथगात्म अस्तित्व असले पाहिजे. असे अस्तित्व की, जे स्वतःमध्ये राहून स्वतःचे जीवन स्वतंत्रपणे जगू शकेल, कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये ते अस्तित्व स्वतंत्र राहू शकेल. म्हणजे असे की, त्याने काहीही ऐकले, काहीही वाचले, काहीही पाहिले तरी त्यामुळे ते अस्तित्व विचलित होता कामा नये. व्यक्तीला बाहेरून जे स्वीकारायचे आहे तेच ती स्वीकारते; तिच्या नियोजनामध्ये जे बसत नाही अशा सर्व गोष्टींना अशी व्यक्ती आपोआपच नकार देते. आपण अमुक एका गोष्टीचा प्रभाव स्वीकारायचा असे व्यक्ती स्वत:हून ठरवीत नाही तोपर्यंत, तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा ठसा उमटू शकणार नाही. असे जेव्हा घडून येते तेव्हा, व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनायला लागते; तिला व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individuality) लाभायला सुरुवात होते. आणि व्यक्तीला जेव्हा अशी व्यक्तिविशिष्टता लाभते तेव्हाच ती त्याचे अर्पण करू शकते. कारण, स्वतःकडेच काही नसेल तर ती व्यक्ती देणार तरी काय आणि कशी? त्यामुळे प्रथम व्यक्तीची, ‘व्यक्ती’ म्हणून घडण झाली पाहिजे त्यानंतरच ती आत्मदान करू शकेल. जोपर्यंत व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म अस्तित्वच तयार होत नाही, तोपर्यंत ती काहीच अर्पण करू शकत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257)

आत्मसाक्षात्कार – ०८

(‘ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करायचा असेल तर, तो कसा करावा, असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे. त्यावर श्रीमाताजींनी खूप विस्तृत उत्तर दिले आहे.

अहंकार विलीन करण्यापूर्वी आधी व्यक्तीचे स्वत:चे स्वतंत्र असे व्यक्तित्व, एक पृथगात्म व्यक्तित्व, (individualised) निर्माण व्हावे लागते, व्यक्तीचे असे स्वतंत्र व्यक्तित्व नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते, त्याची आवश्यकता का असते; इत्यादी सर्व गोष्टी श्रीमाताजी येथे तपशिलवार सांगत आहेत. हा भाग विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत. पण नंतर हे सर्व भाग एकत्रितपणे वाचल्यास सर्व विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, हे येथे नमूद करावेसे वाटते.)

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’मध्ये व्यक्तीने आपला अहंकार कसा विलीन करायचा, असे तुम्हाला विचारायचे आहे का? अहंकार विलीन करायचा असेल तर, त्यासाठी व्यक्ती आधी, पूर्णपणे स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाली पाहिजे. अन्यथा, अहंकाराचे ईश्वरामध्ये विलीनीकरण करणे शक्य होणार नाही. पूर्णपणे पृथगात्म होणे म्हणजे काय? आणि बाहेरच्या सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता असणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे का?

काही दिवसांपूर्वी मला एक पत्र आले होते. त्यात त्या पत्रलेखकाने लिहिले होते की, (आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त) सामान्य साहित्य उदा. कादंबऱ्या, नाटके इ. पुस्तके वाचण्याबाबत तो जरा नाखूष असतो. कारण त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा रंगविलेल्या असतात त्यांचे प्रभाव ग्रहण करण्याची आणि त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे विचार यानुसार, आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला सुरुवात करण्याची न टाळता येण्याजोगी एक प्रवृत्ती त्याच्या प्रकृतीमध्ये आहे.

तुम्हाला कल्पना नाहीये, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक जणं या पत्रलेखकासारखी असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक वाचतात तेव्हा ते वाचताना, स्वत:मध्ये तशा प्रकारच्या (पुस्तकात वर्णन केल्यासारख्या) भावना, विचार, इच्छा, हेतू, वेगवेगळ्या योजना त्यांना जाणवू लागतात; इतकेच काय पण त्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आदर्शसुद्धा अशा व्यक्ती मानू लागतात. ते जणूकाही त्या पुस्तकाच्या वाचनात वाहवत जातात. आणि त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते, कारण अशा व्यक्तींचा नव्याण्णव टक्के स्वभाव हा जणू मऊ लोण्याने बनलेला असतो. त्याच्यावर अंगठ्याने थोडा जरी दाब दिला तर, त्याच्यावर त्या अंगठ्याचा ठसा उमटतो.

आणि (त्यांच्या बाबतीत) प्रत्येक गोष्टच ही त्या ‘अंगठ्या’सारखी असते. म्हणजे एखादा अभिव्यक्त झालेला विचार असेल, एखादे वाचलेले वाक्य असेल, एखादी पाहिलेली वस्तू असेल किंवा दुसरी एखादी व्यक्ती काय करत आहे याचे निरीक्षण करणे असेल किंवा शेजाऱ्याच्या इच्छेचे निरीक्षण करणे असेल, अशा साऱ्या गोष्टीच जणू त्या ‘अंगठ्यासारख्या’ ठसा उमटविणाऱ्या असतात. आणि मग व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्या साऱ्या इच्छा तिथेच (व्यक्तीच्या आतमध्येच) असतात, एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेलेल्या असतात, (श्रीमाताजी हाताची बोटे एकमेकांत गुंफून दाखवितात) त्यातील प्रत्येक इच्छाच दुसऱ्या इच्छेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असते आणि परिणामतः अंतरंगामध्ये आणि बाहेर एक प्रकारचा सततचा झगडा चालू असतो. जणू विद्युतप्रवाह बाहेर पडावा तसा तो माणसांमधून बाहेर पडत असतो आणि आत जात असतो; आले लक्षात?

व्यक्तीला या सगळ्याची जाणीवदेखील नसते. त्या सर्वच इच्छा स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचा परस्परांमध्ये अखंड झगडा चालू असतो आणि त्यामध्ये जी इच्छा सर्वात प्रबळ असते, ती यशस्वी होते. परंतु या इच्छा अनेकविध असल्याने आणि त्या सगळ्यांशी व्यक्तीला एकाकी झुंज द्यावी लागत असल्याने, हा झगडा सोपा नसतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर एखादा लाकडाचा तुकडा जसा खालीवर हेलकावे खात असतो तशी व्यक्तीची अवस्था होते (व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व नसते तेव्हा व्यक्तीची अशी अवस्था असते.)… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 256-257)

आत्मसाक्षात्कार – ०७

(श्रीमाताजी सांगत आहेत की, व्यक्ती ईश्वर-साक्षात्कारासाठी प्रयत्न करू लागली की, आत्मदान करण्याऐवजी सहसा ईश्वरालाच स्वत:कडे ओढू पाहते. आणि त्यामुळेच ती त्यात यशस्वी होत नाही. कारण असे केल्यामुळे व्यक्ती स्वत:च्या अहंमध्येच बंदिस्त होऊन राहते आणि ईश्वर व स्वत:मध्ये एक प्रकारची भिंत उभी करते. यावर उपाय म्हणजे आत्मदान. स्वत:ला शक्य तितके ईश्वराप्रत अर्पण करायला शिका, असे श्रीमाताजींनी सांगितले आहे, त्यावर एका साधकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

साधक : ‘ईश्वर’च अस्तित्वात आहे आणि व्यक्तीला स्वत:चे असे काही अस्तित्वच नाही, अशी जाणीव बाळगण्याचा प्रयत्न केला तर, तो अहंकारातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो का?

श्रीमाताजी : म्हणजे व्यक्तीचे अस्तित्वच नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा रितीने केवळ मनाने विचार करून काही साध्य होईल असे मला वाटत नाही, कारण हा एक प्रकारचा मानसिक प्रयत्न झाला. व्यक्ती अशा प्रकारच्या मानसिक रचना करत राहते आणि त्याद्वारे तिला फारसे काही साध्य होत नाही. अभीप्सेची एक उत्स्फूर्त, उत्कट अशी ज्योत, असे काहीतरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अखंड प्रज्वलित असले पाहिजे…

परंतु (ईश्वर-साक्षात्कार) ही गोष्ट जर केवळ डोक्यामध्येच चालू असेल, म्हणजे ती केवळ मानसिक पातळीवरची असेल तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 138)

आत्मसाक्षात्कार – ०६

बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.

व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)