श्रीमाताजी आणि समीपता – ३०

‘क्ष’ हा साधक बहुधा पुढील दोन चुका करत आहे. तो श्रीमाताजींकडून प्रेमाच्या बाह्य अभिव्यक्तीची अपेक्षा करत आहे आणि दुसरी चूक म्हणजे, खुलेपणा आणि समर्पण यांवर निरपेक्षपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो प्रगती करण्याच्या मागे लागला आहे. साधक नेहमीच या दोन चुका करत असतात.

जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराप्रत खुली होते, उन्मुख होते, जेव्हा ती समर्पित होते, तेव्हा तिच्या प्रकृतीची तयारी झाल्याक्षणीच आपसूकपणे त्या व्यक्तीची प्रगती होते. मात्र (त्याऐवजी) तिने फक्त प्रगतीवरच लक्ष केंद्रित केले तर त्यातून अडचणी, विरोध आणि निराशा या गोष्टी उद्भवतात कारण मन गोष्टींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहत नसते.

खरंतर, श्रीमाताजी ‘क्ष’बाबत विशेष कृपावंत आहेत आणि या मार्गावर टिकून राहण्यासाठी त्याला मदत व्हावी यासाठी त्या दररोज ‘दर्शना’च्या वेळी त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती ओतण्याचा प्रयत्न करत असतात. ‘क्ष’ने मन आणि प्राण यांमध्ये अतिशय शांत राहायला आणि आत्मनिवेदित व्हायला शिकले पाहिजे त्यामुळे तो सजग होईल आणि तो ती शक्ती ग्रहणही करू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

श्रीमाताजी आणि समीपता – २८

ईश्वरी प्रभावाशिवाय अन्य कोणतेही प्रभाव (influences) स्वीकारायचे नाहीत, ही गोष्ट साध्य करून घेण्यासारखी आहे; कारण सहसा मानवी प्रकृती ईश्वरी प्रभाव न स्वीकारता इतरच प्रभाव स्वीकारत असते. श्रीमाताजींच्या दिव्य प्रकाशाच्या आणि दिव्य शक्तीच्या एकमेव प्रभावाखाली राहिल्याने, प्रकृतीमधील जे जे काही बदलणे आवश्यक असते ते, शांतपणे व सहजतेने बदलता येऊ शकते आणि प्रकृतीमधील जे काही विकसित करणे आवश्यक असते ते, कोणत्याही अडथळ्याविना किंवा त्रासाविना विकसित करता येऊ शकते.

*

श्रीमाताजींसोबत असणाऱ्या थेट नात्याचा मार्ग तुमच्यासाठी नेहमीच खुला असतो आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा तेव्हा तो मार्ग तिथे असतोच, कारण ही गोष्ट आंतरिक अस्तित्वाशी संबंधित असते. जेव्हा कधी तुम्ही अंतरंगात खोलवर प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला ते नाते गवसेलच; मात्र त्याने पृष्ठस्तरावर येऊन, बाह्य प्रकृतीचे आणि बाह्य जीवनाचे शासन (govern) करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच तुम्ही अंतरंगामध्ये प्रविष्ट होण्यासाठी आणि साधनेमध्ये आंतरिक प्रगती करण्यासाठी काही वेळ द्यावा असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 486-487)

श्रीमाताजी आणि समीपता – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधक : पूर्ण दिवसभर माझा प्राण आक्रंदन करत होता. श्रीमाताजी आपल्याबाबत निष्ठुर झाल्या आहेत असे त्याला वाटत होते आणि त्यांच्या प्रेमापासून तो वंचित झाला आहे असे वाटल्यामुळे, तो आकांत करत होता. त्यांच्या मौनामुळे तो कोलमडून पडतो, आणि त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तो कोमेजून जातो.

श्रीअरविंद : जो प्राण अहंकाराने, इच्छा-आकांक्षांनी, अपेक्षांनी भरलेला असतो आणि त्यामुळे जो असमाधानी होतो, सारखी कुरबुर करत राहतो आणि जो भ्रांत कल्पना आणि स्वयं-निर्मित दुःखाने भरलेला असतो, अशा परिवर्तन न झालेल्या प्राणाची ही लक्षणे आहेत.

साधक : पण माझ्यामध्येच अशीही एक प्रवृत्ती आहे की जिला ही सारी सुख-दुःखं टाळावीशी वाटतात, जिला फक्त श्रीमाताजींवर विसंबून राहण्याची इच्छा असते. मात्र माताजींकडून काहीतरी प्राप्त व्हावे अशी त्या प्रवृत्तीची इच्छा नाहीये, तर आपण श्रीमाताजींप्रति स्वतःचे आत्मदान करावे असे तिला वाटत असते, श्रीमाताजींनी आपल्यामध्ये अवतरित व्हावे आणि आपल्याला वर उचलून न्यावे यासाठी ती प्रवृत्ती प्रार्थना करत असते. ती माझ्या हृदयामध्ये आहे. आणि तिचा स्थायीभाव ‘समर्पण’ हा आहे.

श्रीअरविंद : तुम्ही जे काही सांगत आहात ते चैत्य पुरुषाचे (psychic being) आणि त्याच्या श्रीमाताजींसोबत असलेल्या नात्याचे तंतोतंत वर्णन आहे. हे खरे नाते होय. ‘पूर्णयोगा’मध्ये यशस्वी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्यामधील अहंकारी प्राणिक प्रवृत्तीला नकार दिला पाहिजे आणि तुमची साधना या आंतरात्मिक नात्यावर (psychic relation) सुस्थिर केली पाहिजे. चैत्य पुरुष अग्रभागी येणे आणि तो तेथेच स्थिरावणे ही पूर्णयोगामधील एक निर्णायक पायरी असते.

मागच्या वेळी जेव्हा तुम्ही श्रीमाताजींना भेटला होतात तेव्हा हेच घडले होते, तुमचा चैत्य पुरुष अग्रभागी आला होता. परंतु तुम्ही तो कायम तसाच पुढे ठेवला पाहिजे. मात्र जर तुमचा प्राणिक अहंकार आणि त्याचा आक्रोश यांचेच म्हणणे तुम्ही ऐकत राहिलात तर तसे करणे तुम्हाला शक्य होणार नाही. श्रद्धा, समर्पण आणि विशुद्ध आत्मदानाचा (self-giving) आनंद यामुळे, म्हणजेच या आंतरात्मिक दृष्टिकोनामुळेच व्यक्ती ‘सत्या’मध्ये उन्नत होते आणि ईश्वराशी एकात्म पावते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 464-465)