श्रीमाताजी आणि समीपता – ३७
वैश्विक ‘ईश्वरी प्रेम’ सर्वांसाठी समानच असते. त्याचबरोबर व्यक्तिगत असणारा असा एक आंतरात्मिक अनुबंधदेखील (psychic connection) असतो. मूलतः तोदेखील सर्वांसाठी समानच असतो, पण त्यामध्ये प्रत्येकाशी असलेल्या विशेष नात्याला मुभा असते, आणि हे नाते मात्र सर्वांसाठी समान नसते, तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असते. आणि त्याचे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र स्वरूप असते, ते त्याच्याच पद्धतीचे असते आणि त्याची इतरांशी तुलना करता येत नाही. इतर नात्यांशी तुलना करता ते तसेच असावे किंवा तोलूनमापून, संतुलित असावे अशी अपेक्षा इथे बाळगता येत नाही कारण ते प्रत्येक नाते अगदी स्वतंत्र असते.
…श्रीमाताजींचे प्रेम व्यक्तीला जाणवेल किंवा नाही हे ती व्यक्ती त्यांच्याप्रति खुली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते, ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्यापासून किती जवळ वा दूर आहे यावर ते अवलंबून नसते. आंतरिक नात्याबद्दल व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी अचेत, जाणीवरहित (unconscious) बनवितात त्या गोष्टी तिने स्वतःमधून काढून टाकणे म्हणजे खुलेपणा (Openness). व्यक्तीला अंतरंगामध्ये जे नाते जाणवते त्याऐवजी त्या नात्याच्या बाह्याविष्करणाद्वारे त्याचे मोजमाप करणे, या संकल्पनेइतकी अन्य कोणतीच संकल्पना व्यक्तीला अचेत बनवीत नाही; (इतकेच नव्हे तर) या संकल्पनेमुळे, आंतरिक नात्याचे जे काही बाह्य आविष्करण दिसून येत असते त्याबद्दलही व्यक्ती अंध किंवा असंवेदनशील बनते. व्यक्ती श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या दूर अंतरावर असली किंवा ती त्यांना क्वचितच भेटत असली तरीही व्यक्तीला ते नाते जाणवते; उलट व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्याजवळ असूनही किंवा ती नेहमी श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वावरत असली तरीदेखील, म्हणजे असे नाते असूनसुद्धा ते त्या व्यक्तीला न जाणवण्याची शक्यता असते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 507-508)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







