श्रीमाताजी आणि समीपता – ३४
श्रीमाताजी आणि समीपता – ३४
एखाद्याचे श्रीमाताजींशी जर आंतरिक नाते असेल तर त्या नेहमी आपल्या समीप आहेत, आपल्या अंतरंगात आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत असे त्याला जाणवत असते. आणि मग आपण प्रत्यक्ष श्रीमाताजींच्या जवळ असावे असा त्याचा आग्रह असत नाही. ज्यांचे श्रीमाताजींबरोबर अजून अशा प्रकारचे आंतरिक नाते निर्माण झालेले नाही त्यांनी त्यासाठी आस बाळगावी; मात्र आपण त्यांच्या प्रत्यक्षपणे समीप असावे असा आग्रह धरू नये. समजा, अगदी बाह्य सान्निध्य जरी त्यांना लाभले तरी त्यांच्या असे लक्षात येईल की, आंतरिक समीपतेखेरीज किंवा आंतरिक एकत्वाखेरीज त्या बाह्य सान्निध्याला विशेष अर्थ नाही. एखादी व्यक्ती भौतिकदृष्ट्या श्रीमाताजींच्या जवळ असूनदेखील आंतरिकदृष्ट्या मात्र ती त्यांच्यापासून खूप दूर असू शकते.
*
बाह्य परिस्थिती कशी का असेना, वृत्ती अंतर्मुख ठेवून, श्रीमाताजींशी आंतरिक संपर्क प्रस्थापित करणे ही एकमेव आवश्यक गोष्ट आहे, आणि एकदा ही गोष्ट साध्य झाली की तीच स्वत:हून इतर सर्व आवश्यक गोष्टी घडवून आणेल. काहीजण असे आहेत की, जे योगामध्ये प्रगत झाले आहेत परंतु ते प्रत्यक्षात श्रीमाताजींना वारंवार भेटतातच असे नाही. त्याचप्रमाणे असेही काहीजण आहेत की, जे प्रणाम आणि सायं-ध्यान याव्यतिरिक्त, श्रीमाताजींना वर्षातून फक्त एकदाच भेटतात आणि असे असूनही ते सारे सदोदित श्रीमाताजींच्या समीप असतात किंवा ऐक्यभावात असतात.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 495, 496)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026





