श्रीमाताजी आणि समीपता – २३

श्रीमाताजी आणि समीपता – २३

साधक : गेली चार वर्षे माझा अंतरात्मा नेहमीच सक्रिय आणि अग्रभागी होता, हे माझे म्हणणे योग्य आहे का? माझ्या प्रकृतिगत घटकांना धक्का न लावता, म्हणजे त्यासंबंधी कोणताही विचार करण्याची आवश्यकता न पडता, आता श्रीमाताजी माझ्यावर कार्य करू शकतात का?

श्रीअरविंद : तुमचा अंतरात्मा अग्रभागी आलेला असेल आणि सक्रिय असेल म्हणजेच जर तो मन, प्राण व शरीर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आणि त्यांचे परिवर्तन करण्यात व्यग्र असेल तर, श्रीमाताजींच्या तुमच्या बाबतीतल्या कार्यामुळे तुमची प्रकृती अस्वस्थ होते, हे कसे काय?

अंतरात्मा हा जर अग्रभागी आला असता आणि तो सक्रिय झाला असता तर, त्याने अस्वस्थ होऊ पाहणाऱ्या प्रकृतिगत कोणत्याही घटकाला त्वरेने सांगितले असते की, “श्रीमाताजी जे करू पाहत आहेत किंवा त्यांनी जे ठरविलेले आहे ते पूर्ण समर्पित वृत्तीने आणि आनंदाने स्वीकारलेच पाहिजे. काय केले पाहिजे हे श्रीमाताजींपेक्षा आपल्याला अधिक चांगले समजते असे तुमच्या मनाला कदापिही वाटता कामा नये आणि आपल्या स्वतःच्या इच्छाआकांक्षा आणि पसंती-नापंसतीनुसार श्रीमाताजींनी वागावे, असे तुमच्या प्राणाला वाटता कामा नये. कारण अशा प्रकारच्या कल्पना, इच्छा या जुन्या प्रकृतीशी संबंधित असतात आणि त्यांना आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रकृतीमध्ये जागा नसते, या साऱ्या अहंकाराच्या त्रुटी असतात.” आणि जर तुमच्या अंतरात्म्याचे तुमच्या प्रकृतीवर नियंत्रण असते तर, कोणतीही अस्वस्थता ही एकाएकी नाहीशी तरी झाली असती अन्यथा ती विरून तरी गेली असती. तुमच्या अंतरात्म्याचे तुमच्या प्रकृतीवर खरोखरच नियंत्रण असते तर अशा प्रकारची कोणतीही अस्वस्थता शिल्लक राहणे शक्यच नाही.

त्यामुळे असे समजायला हरकत नाही की, अंतरात्मा तुमच्या अस्तित्वावर काही प्रमाणात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यांचे नियंत्रण ही अजून खूपच दूरची गोष्ट आहे किंवा तुमचा प्राण पुन्हा उफाळून वर आला आहे आणि त्याने अंतरात्म्याला झाकून टाकले आहे आणि त्यामुळे अंतरात्म्याचा प्रभाव तात्पुरता का होईना पण नाहीसा झालेला आहे. पण जर अंतरात्मा हा पूर्णपणे पुढे आलेला असेल, म्हणजे तो झाकोळलेला किंवा नुकताच उदयोन्मुख अवस्थेत आलेला नसेल तर, तो कशानेही झाकला जाणे हे केवळ असंभव. फार फार तर पृष्ठभागावर काहीशी अस्वस्थता जाणवत आहे पण अंतरंगामध्ये मात्र सारे काही शांत, सचेत आणि भक्तिमय आहे असे असू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 470)

श्रीअरविंद