श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध
श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध :
जन्माने बंगाली असलेल्या श्रीअरविंद यांचे मराठी समुदायाशी, मराठी व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यांचे मराठीशी, महाराष्ट्राशी असलेले हे नाते अल्पज्ञात आहे. तेव्हा त्यांचा महाराष्ट्राशी असलेला अनुबंध थोडक्यात समजावून घेऊ.
श्रीअरविंद आणि महाराजा सयाजीराव गायकवाड :
अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. आणि त्यातून त्यांना बडोद्याच्या सेवेची संधी प्राप्त झाली. बडोदानरेशांच्या सचिवालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. नंतर बडोदा कॉलेजमध्ये ते उपप्राचार्य होते.
श्रीअरविंद आणि विष्णु भास्कर लेले :
विष्णु भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले. श्री. लेले यांनी त्यांना ‘मन निर्विचार कसे करायचे’ याचे धडे दिले. अवघ्या तीन दिवसांत अरविंद घोष यांना ती स्थिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांना ‘शांत ब्रह्म-चेतने’चा अनुभव आला आणि पुढेही तो अनुभव अनेक दिवस कायम तसाच टिकून राहिला, असे ते सांगतात.
श्रीअरविंदांचे महाराष्ट्र दौरे :
शांत ब्रह्म-चेतनेच्या या टिकून राहिलेल्या अनुभूतीच्या दरम्यानच अरविंद घोष यांनी मार्गदर्शक श्री. लेले यांच्या समवेत, महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि त्याची सुरुवात पुण्यापासून केली होती. त्यांच्या अनुभूतीजन्य भाषणांचा पहिलावहिला लाभ मिळाला होता तो महाराष्ट्रालाच! १२ जानेवारी १९०८ ते ०१ फेब्रुवारी १९०८ या कालावधीत त्यांची पुणे, गिरगाव, नाशिक, धुळे, अमरावती, अकोला, नागपूर येथे भाषणे झाली होती.
श्रीअरविंद आणि लोकमान्य टिळक :
अहमदाबाद येथे इ.स. १९०२ साली झालेल्या काँग्रेस परिषदेमध्ये अरविंद घोष हे लोकमान्य टिळक यांना प्रथम भेटले. पुढे १९०७ सालच्या सुरत काँग्रेसमध्ये लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्यरत होते.
श्रीअरविंद आणि इंदुप्रकाश साप्ताहिक :
अरविंद घोष यांनी आपल्या राजकीय, सामाजिक जीवनाच्या कारकिर्दीस सुरुवात केली ती इंदुप्रकाश या मराठी-इंग्रजी साप्ताहिकातील लेखमालेच्या रूपाने, असे म्हटले तर वावगे ठरू नये. ‘New Lamps for Old’, या लेखमालेतील नऊ भाग ०७ ऑगस्ट १८९३ ते ०६ मार्च १८९४ या कालावधीत इंदुप्रकाशमध्ये प्रकाशित झाले होते. ही लेखमाला विशेष गाजली होती. कारण त्यामध्ये तत्कालीन काँग्रेसच्या मवाळ धोरणावर कडाडून प्रहार करण्यात आला होता.
श्रीअरविंद आणि बाजीप्रभू देशपांडे :
श्रीअरविंद यांनी ‘बाजी प्रभू’ ही वीररसप्रधान मुक्तछंदातील दीर्घ कविता त्यांच्या राजकीय धामधुमीच्या काळातच लिहिलेली आहे. मार्च इ. स. १९१० मध्ये ती ‘कर्मयोगिन्’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. बाजी प्रभूंनी आपल्या कर्तबगारीने मृत्यूवर मिळविलेल्या विजयाचे रोमहर्षक चित्रण या कवितेत येते.
श्रीअरविंद आणि मराठी :
श्रीअरविंद हे बहुभाषाकोविद होते. इंग्रजी व फ्रेंच या भाषांवर प्रभुत्व होते. लहान वयातच त्यांनी लॅटिन, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले होते. इंग्लंडमध्ये असतानाच ते जर्मन, स्पॅनिश, इटालियन ह्या भाषा शिकले. बडोद्यात राहू लागल्यावर बंगाली, गुजराथी, तमिळ आणि संस्कृत आदी भारतीय भाषा शिकले. त्यात मराठीचाही समावेश आहे.
त्यांच्या लिखाणात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे गौरवोद्गार आलेले दिसतात.
श्रीअरविंदांचा मराठी, मराठी माणसे, मराठी संस्कृती, मराठीतील थोर व्यक्तिमत्त्वे या साऱ्यांशी कसा घनिष्ठ संबंध होता हे वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल. परंतु असे असून देखील मराठी बांधवांना पाँडेचेरी, श्रीअरविंद किंवा श्रीमाताजी, त्यांचा आश्रम या गोष्टी दूरस्थ वाटतात असे दिसते. महाराष्ट्राला श्रीअरविंद यांच्या वाङ्मयाची, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पुरेशी ओळख आहे, असे आढळत नाही. किंबहुना मराठी माणूस याविषयी एकंदरच अनभिज्ञच आहे, असे वाटावे अशी परिस्थिती आहे. मात्र साऱ्याला सन्माननीय अपवाद ठरतात ते म्हणजे ‘सेनापती बापट’!
श्रीअरविंद आणि सेनापती बापट :
श्रीअरविंदांचे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. साहित्य सेनापती बापट यांनी अनुवादित केले आहे.
सेनापती बापटांप्रमाणेच पुढील काळात डॉ. ग. ना. जोशी, सदानंद सुंठणकर यासारख्यांनी श्रीअरविंद यांचे साहित्य मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यथाशक्य सर्व प्रयास केले. यामध्ये पाँडेचेरी स्थित कै. भा. द. लिमये आणि कै. विमल भिडे यांचाही आदराने उल्लेख करावा लागेल.
आणि आज…..
आज ‘अभीप्सा मराठी मासिक’ एक प्रकारे हीच परंपरा पुढे चालवू पाहत आहे.
समग्र मानवजातीचेच उत्थान करू पाहणाऱ्या ‘पूर्णयोगा’चे तत्त्वज्ञान मराठी बांधवाना ज्ञात व्हावे, याच एका तळमळीने ‘अभीप्सा मराठी मासिक’ तसेच ‘auromarathi.org’ हे संकेतस्थळ, ‘अभीप्साचे फेसबुक पेज’ आणि ‘Auro Marathi’ हे youtube चॅनल कार्यरत आहेत.
आपल्या साऱ्यांच्या प्रेमामुळे व सहकार्यामुळे वरील सर्व माध्यमांद्वारे, श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे मराठी अनुवादित ‘विचारधन’ तीस हजारांहून अधिक वाचक व दर्शकांपर्यंत जाऊन पोहोचले आहे आणि ते सारेजण या विचारधारेमध्ये प्रविष्ट झाले आहेत. आज ‘auromarathi.org’ या संकेतस्थळाचा पाचवा वर्धापनदिन आहे, हे कळविण्यास अतीव समाधान होत आहे.
आपले सहकार्य व प्रेम यापुढेही असेच अखंडितपणे लाभत राहो, हीच प्रार्थना! श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कृपाशीर्वाद आहेतच….
आपण अजूनही या संकेतस्थळास Subscribe केले नसेल तर, नक्की Subscribe करा. त्यासाठी ‘बेल’ आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे कार्य करणाऱ्यांना अधिक ‘उर्जा व मनोबल’ प्राप्त होऊ शकते. ही सेवा विनामूल्य आहे. धन्यवाद!!!
– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025
- आत्मसाक्षात्कार – ०१ - July 17, 2025







