साधना, योग आणि रूपांतरण – ३००

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : अवचेतनाने (subconscient) उच्चतर चेतनेचा स्वीकार केला आहे का?

श्रीमाताजी : अवचेतनाने उच्चतर चेतनेचा स्वीकार केला असता, तर ते अवचेतन या रूपात शिल्लकच राहिले नसते, तर ते स्वयमेव चेतना बनले असते. मला वाटते तुम्हाला असे विचारायचे आहे की, अवचेतनाने उच्चतर चेतनेचा आधिपत्य आणि कायदा मान्य केला आहे का? ही गोष्ट समग्रतया झालेली नाही कारण अवचेतन ही प्रचंड आणि जटिल अशी गोष्ट आहे; मानसिक अवचेतन, प्राणिक अवचेतन, जडभौतिक अवचेतन आणि शारीरिक-अवचेतन अशा प्रकारच्या अवचेतना असतात. आपल्याला या अवचेतनाच्या अज्ञानी आणि जड प्रतिकाराला अंशाअंशाने बाहेर काढायचे आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 363-364)

*

जेव्हा मन निःस्तरंग, नीरव होते तेव्हाच अवचेतन रिक्त होऊ शकते. त्यासाठी काय केले पाहिजे? तर, अवचेतनामधून सर्व जुन्या अज्ञानी अ-योगिक, योगसुसंगत नसलेल्या गोष्टी बाहेर काढून टाकल्या पाहिजेत.

*

(तुमच्यामधील) अवचेतन प्रांत जर रिकामा झाला असेल तर त्याचा अर्थ असा की, आता तुम्ही सामान्य चेतनेच्या पलीकडे गेला आहात आणि स्वयमेव अवचेतन हे ‘सत्या’चे साधन होण्यासाठी सुसज्ज झाले आहे.

*

जोपर्यंत अगदी अवचेतनापर्यंत, पूर्णपणे आणि समग्रतया, अतिमानसिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीच्या या ना त्या भागावर कनिष्ठ प्रकृतीचा ताबा राहणारच.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1594), (CWSA 31 : 611 & 595)

श्रीअरविंद