साधना, योग आणि रूपांतरण – २८२

शरीराचे रूपांतरण

दु:ख येते तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते आणि जितक्या लवकर आपण हा धडा घेऊ तितक्या प्रमाणात दु:खाची गरज कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्याचे रहस्य कळते, तेव्हा दु:खाची शक्यताच मावळून जाते. कारण ते रहस्य आपल्याला कारणाचा उलगडा करून देते; दु:खाचे मूळ, त्याचे ध्येय आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीने अहंभावाच्या वर उठून, त्याच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, त्याच्यामध्ये विलीन व्हावे, आपण ‘ईश्वरा’पासून दुरावले जाऊ अशी संधी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीला देऊ नये; (हे व्यक्तीला उमगावे म्हणून दु:खभोग असतात,) हे ते रहस्य आहे. आणि एकदा का व्यक्तीला हे रहस्य गवसले आणि तिने स्वत:मध्ये त्याची अनुभूती घेतली की, दु:खाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग नाहीसे होतात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून अस्तित्वाच्या केवळ सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, किंवा आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान ठरतो असे नव्हे, तर तो उपाय जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो. या रहस्याचा जो शोध लागलेला असतो त्यास किंवा ते रहस्य प्रत्यक्षात उतरविण्याच्या कृतीस विरोध करू शकेल असा कोणताच आजार किंवा कोणताच विकार नसतो. म्हणजे असा आजार केवळ व्यक्तीच्या उच्चतर भागांमध्येच नव्हे तर, शरीराच्या पेशींमध्येदेखील असू शकत नाही.

पेशींना त्यांच्या आतमध्ये दडलेल्या वैभवाविषयी शिकविण्याची युक्ती जर व्यक्तीला कळली; तसेच त्या पेशी ज्यामुळे अस्तित्वात आहेत, ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त झाले आहे त्या वास्तविकतेची जाण एखादी व्यक्ती जर त्यांना करून देऊ शकली, तर त्या पेशीसुद्धा संपूर्ण सुसंवादी होतात आणि ज्याप्रमाणे व्यक्तीचे इतर सारे विकार नाहीसे होतात अगदी त्याचप्रमाणे शारीरिक विकारही नाहीसे होतात.

परंतु असे व्हायला हवे असेल तर व्यक्तीने भित्रे किंवा भीतीग्रस्त असता कामा नये. जेव्हा एखादी शारीरिक व्याधी येते तेव्हा व्यक्तीने घाबरून जाता कामा नये किंवा तिच्यापासून पळ काढता कामा नये, तर व्यक्तीने त्या व्याधीला धीराने, शांतस्थिरतेने, विश्वासाने आणि खात्रीने सामोरे गेले पाहिजे. त्या व्यक्तीला ही खात्री असली पाहिजे की, आजारपण हे मिथ्यत्व आहे, आणि व्यक्ती जर पूर्णपणे, अगदी पूर्ण विश्वासाने, संपूर्ण अविचलतेने ‘ईश्वरी कृपे’कडे वळली तर ती कृपा, जशी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये खोलवर प्रस्थापित झालेली असते तशीच ती या पेशींमध्ये स्थिर होईल आणि शाश्वत ‘सत्य’ व ‘आनंदा’मध्ये या पेशीसुद्धा सहभागी होतील.

– श्रीमाताजी (CWM 09 : 42-43)

श्रीमाताजी