साधना, योग आणि रूपांतरण – २३३
फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.
काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.
व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025