साधना, योग आणि रूपांतरण – २२८
अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.
अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.
परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.
जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.
साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२८ - January 20, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२७ - January 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025