साधना, योग आणि रूपांतरण – २१८
साधना, योग आणि रूपांतरण – २१८
उत्तरार्ध
योगसाधना करताना पुष्कळजण मन, प्राण, शरीरात स्थित असतात, अधूनमधून अथवा काही प्रमाणात उच्च मनाने आणि प्रदीप्त मनाने उजळून जातात. पण ‘अतिमानसिक परिवर्तना’च्या (supramental change) तयारीसाठी, ‘अंतर्ज्ञान’ (Intuition) आणि ‘अधिमानस’ (Overmind) यांप्रत (शक्य तितक्या लवकर, व्यक्तिश: तशी वेळ येताच) उन्मुख होणे आवश्यक असते. कारण त्यामुळे समग्र अस्तित्व आणि समग्र प्रकृती अतिमानसिक परिवर्तनासाठी सुसज्ज बनवता येऊ शकेल. शांतपणे विकसित होण्यासाठी व विशाल होण्यासाठी चेतनेला मुभा द्या आणि मग हळूहळू या गोष्टींचे ज्ञान होत जाईल.
शांती, विवेक, अलिप्तता (पण उदासीनता किंवा अनुत्साह नव्हे) या बाबी फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी रूपांतर-क्रियेत खूपच अडथळा निर्माण करतात. अभीप्सेची उत्कटता असली पाहिजे पण ती शांती, विवेक, अलिप्तता या सर्वांच्या बरोबरीने असायला हवी. घाई नको, आळस नको, राजसिक अति-उत्कंठा नको आणि तामसिक नाउमेदीचा हतोत्साहदेखील नको. तर स्थिर आणि सातत्यपूर्ण पण शांत आवाहन व कार्य हवे. साक्षात्कार झालाच पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये, तर अंतरंगातून आणि वरून येण्यास त्याला मुभा दिली पाहिजे. त्याचे क्षेत्र, त्याचे स्वरूप, त्याच्या मर्यादा यांचे अचूक निरीक्षण केले पाहिजे. श्रीमाताजींची शक्ती तुमच्यात कार्य करू दे, मात्र त्यामध्ये कोणत्याही निम्न गोष्टींची मिसळण होऊ नये यासाठी सावध राहा. पुष्ट झालेल्या अहंभावाच्या कृती किंवा सत्याचा वेश धारण केलेली अज्ञानाची शक्ती या गोष्टी तर तिची जागा घेत नाही ना याची काळजी घ्या. विशेषत: प्रकृतीमधील सर्व अंधकार आणि अचेतनता यांचा निरास होवो अशी अभीप्सा बाळगा. अतिमानसिक परिवर्तनाच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या या मुख्य अटी आहेत; पण त्यांपैकी एकही गोष्ट सोपी नाही, आणि प्रकृती सज्ज झाली आहे असे म्हणण्यासाठी, त्यापूर्वी या अटींची परिपूर्ती होणे आवश्यक असते.
जर योग्य दृष्टिकोन प्रस्थापित करता आला (आत्मिक, निरहंकारी आणि केवळ दिव्य शक्तीलाच उन्मुख असणारी वृत्ती) प्रस्थापित करता आली तर ही प्रक्रिया पुष्कळ जलद गतीने होऊ शकते. योग्य वृत्ती स्वीकारणे आणि ती टिकवून ठेवणे, तसेच पुढे जाऊन स्वत:मध्ये बदल घडविणे अशा प्रकारचा हातभार तुम्ही लावू शकता. सर्वसाधारण बदल घडून येण्यासाठी साहाय्यकारी ठरेल अशी ही एक गोष्ट आहे.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 333-334)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026






