साधना, योग आणि रूपांतरण – २१५
स्थितप्रज्ञ असणे याचा अर्थ व्यक्तीचे केवळ विचारी मन (thinking mind) आत्म-साक्षात्कारामधील आध्यात्मिक चेतनेमध्ये सुस्थिर असणे असा होतो. त्यामुळे प्रकृतीच्या अन्य घटकांचे ‘रूपांतरण’ होईलच असे काही आवश्यक नाही. उच्चतर चेतनेचा ‘प्रकाश’ आणि तिची ‘शक्ती’ खाली उतरविणे; चैत्य अस्तित्व (psychic) आणि मन, प्राण व शरीराची केंद्र खुली होणे; आंतरात्मिक आणि उच्चतर चेतनेच्या कार्याला प्रकृतीने संमती देणे आणि तिच्याप्रत स्वीकारशील रीतीने खुले होणे; आणि सरतेशेवटी प्रकृतीने अतिमानसाप्रत खुले होणे, या साऱ्या ‘रूपांतरणा’साठी आवश्यक असणाऱ्या अटी असतात.
उच्चतर चेतना (higher consciousness) ही अशी एक गोष्ट असते की जी मनुष्याच्या मन, प्राण आणि शरीर यांच्या ऊर्ध्वस्थित असते. ती संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. ती प्राप्त करून घेणे याचा अर्थ एवढाच की, व्यक्ती तेथे इच्छेनुसार जाण्यास सक्षम असते किंवा व्यक्ती तिच्या चेतनेच्या कोणत्यातरी एखाद्या घटकानिशी तेथे निवास करू शकते आणि त्या दरम्यान तिचे इतर घटक मात्र जुन्या पद्धतीनेच कार्यरत असतात. समग्र अस्तित्व जेव्हा अंतरात्म्याच्या साच्यामध्ये ओतले जाते (remoulded) तेव्हा ‘आंतरात्मिक रूपांतरण’ (psychic transformation) घडून येते. समग्र अस्तित्वाचे जेव्हा आध्यात्मिकीकरण केले जाते तेव्हा ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) घडून येते. आणि समग्र अस्तित्वाचे जेव्हा अतिमानसिकीकरण केले जाते तेव्हा ‘अतिमानसिक रूपांतरण’ (supramental transformation) घडून येते. व्यक्ती केवळ उच्चतर चेतनेविषयी जागरूक झाली किंवा सामान्य मर्यादित अर्थाने व्यक्तीने ती उच्चतर चेतना प्राप्त करून घेतली म्हणून या सर्व गोष्टी, आपोआप घडून येतात, असे होत नाही.
अर्थात शरीर हे त्याचे अधिष्ठान असते. शरीर, प्राण आणि मन व त्याच्या उच्चतर पातळ्या या सर्वांचा समावेश कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. आत्म-सुसूत्रीकरणाचे (self-formulation) साधन असणारे ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘दिव्य’ सत्-चित्-आनंद यांचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. कनिष्ठ आणि ऊर्ध्व या दोन गोलार्धाच्या मधोमध ‘अधिमानस’ (Overmind) असते. ‘अधिमानस’ हे कनिष्ठ गोलार्धाच्या शिखरस्थानी असते. अधिमानस हा या दोन्ही गोलार्धातील मध्यावधी किंवा संक्रमणकारी स्तर असतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 30 : 331-332)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025