साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

साधना, योग आणि रूपांतरण – १८६

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०२

(योगामध्ये आपले आंतरिक मन, प्राण व शरीर हे चैत्य पुरुषाप्रत खुले आणि ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुख होण्याची आवश्यकता असते. ती आवश्यकता असण्याचे) मूलभूत कारण असे की, मन, प्राण आणि शरीर या छोट्या गोष्टी ज्यांना आपण ‘मी’ असे संबोधतो, त्या गोष्टी म्हणजे केवळ बाह्यवर्ती गतीविधी असतात, या गोष्टी म्हणजे अजिबातच आपले खरे ‘स्वरूप’ नसते. या गोष्टी म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा केवळ एक बाह्यवर्ती अंशभाग असतो, जो एका छोट्याशा जीवनासाठी आणि अज्ञानाच्या लीलेसाठी पुढे करण्यात आलेला असतो. त्या व्यक्तिमत्त्वामध्ये सत्याच्या तुकड्यांच्या शोधासाठी धडपडणारे, अडखळणारे अज्ञानी मन असते; सुखाच्या चार क्षणांच्या शोधासाठी धावपळ करणारा अज्ञानी प्राण असतो आणि तमोग्रस्त व बहुतांशी अवचेतन असे शरीर असते. असे हे व्यक्तिमत्त्व, परिणामस्वरूप मिळणाऱ्या वेदना किंवा सुख यांच्यावर स्वामित्व मिळविण्याऐवजी वस्तुमात्रांचे परिणाम आणि दु:खभोग झेलत राहते.

या सर्व गोष्टी कधीपर्यंत स्वीकारल्या जातात? तर जोपर्यंत मनाला उबग येत नाही आणि ते जोवर स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या खऱ्या ‘सत्या’चा शोध घ्यायला सुरुवात करत नाही, जोपर्यंत प्राणाला वीट येत नाही आणि खरा आनंद नावाची काही चीज अस्तित्वात आहे की नाही याविषयी तो विचार करू लागत नाही, आणि जोपर्यंत शरीर थकून जात नाही आणि स्वतःपासून आणि स्वतःच्या यातना आणि सुखापासून सुटका व्हावी असे त्याला वाटत नाही तोपर्यंत हे सारे (त्या बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्वाकडून) स्वीकारले जाते.

(जेव्हा मनाला उबग येतो, प्राणाला वीट येतो, आणि शरीर थकून जाते) तेव्हा मग हे छोटे, अज्ञानी, आंशिक, बाह्यवर्ती व्यक्तिमत्त्व स्वतःच्या खऱ्या ‘स्वरूपा’कडे आणि त्याबरोबरच महत्तर गोष्टींकडे परतण्याची शक्यता असते, अथवा त्याचा म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतः होऊनच लय होऊन, त्याचे निर्वाण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 324-325)

साधना, योग आणि रूपांतरण – १८५

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया खुलासेवार उलगडवून दाखविली आहे. हे पत्र महत्त्वाचे पण बरेच विस्तृत आहे. त्यामुळे आपण ते क्रमश: विचारात घेणार आहोत.)

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०१

‘शांति’ (Peace) किंवा ‘नीरवता’ (Silence) लाभण्यासाठी वरून होणारे अवतरण हा निर्णायक मार्ग असतो. वास्तविक, दृश्यरूपात नेहमीच तसे दिसले नाही तरी, प्रत्यक्षात मात्र या गोष्टी नेहमीच अशा रीतीने घडून येतात. ‘दृश्यरूपात नेहमीच तसे दिसत नसले’, असे म्हणण्याचे कारण की साधकाला या प्रक्रियेची नेहमीच जाणीव असते असे नाही. त्याच्यामध्ये शांती स्थिरावते आहे किंवा किमान आविष्कृत तरी होत आहे असे त्याला जाणवते, पण ती कशी आणि केव्हा येते याची त्याला जाणीव नसते. तरीही हे सत्य आहे की, जे जे काही उच्चतर चेतनेशी संबंधित असते ते वरून येते; केवळ आध्यात्मिक शांती, नीरवता याच गोष्टी नव्हेत तर ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘ज्ञान’, उच्चतर दृष्टी आणि विचार, ‘आनंद’ या सर्वच गोष्टी वरून येतात.

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत या गोष्टी अंतरंगातून सुद्धा येऊ शकतात; परंतु ते यामुळे शक्य होते कारण ‘चैत्य पुरुष’ (psychic being) त्यांच्याप्रत थेटपणे खुला झालेला असतो आणि त्यामुळे उपरोक्त गोष्टी आधी तेथे येतात आणि चैत्य पुरुषाद्वारे, किंवा त्याच्या पुढे येण्यामुळे, या गोष्टी स्वतःला, अस्तित्वाच्या इतर अंगांमध्येदेखील प्रकट करतात.

अंतरंगातून होणारे प्रकटीकरण किंवा वरून होणारे अवतरण हे ‘योगसिद्धी’चे दोन सार्वभौम मार्ग आहेत. बाह्य पृष्ठवर्ती मनाचा प्रयत्न किंवा भावना, एखाद्या प्रकारची तपस्या या सगळ्यांमधून या गोष्टींची काहीशी घडण होते असे वाटते, पण त्यांचे परिणाम हे, या दोन मूलगामी मार्गांच्या तुलनेत, बहुतेक वेळा अनिश्चित आणि आंशिक असतात. आणि म्हणूनच आम्ही या ‘पूर्णयोगा’मध्ये ‘उन्मुखते’वर, खुलेपणावर (opening) नेहमीच एवढा भर देत असतो. आपल्या आंतरिक मनाचे, प्राणाचे, शरीराचे आपल्या आंतरतम भागाप्रत, चैत्य पुरुषाप्रत असलेले खुलेपण आणि मनाच्या ऊर्ध्वदिशेस असणाऱ्या तत्त्वाप्रत उन्मुखता, या गोष्टी साधनेच्या फलप्राप्तीसाठी अपरिहार्य असतात. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 323-324)

साधना, योग आणि रूपांतरण – १८४

साधक : मी योगसाधना करत आहे की नाही हे मला समजत नाहीये. मी ‘पूर्णयोगा’ची साधना करत आहे असे म्हणता येईल का?

श्रीअरविंद : जो कोणी श्रीमाताजींकडे वळला आहे तो प्रत्येक जण माझा योग करत आहे. व्यक्ती (स्व-प्रयत्नाने) पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे; म्हणजे स्व-प्रयत्नाने व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते, असे समजणे ही घोडचूक आहे. कोणीच तसे करू शकत नाही.

व्यक्तीने काय केले पाहिजे? तर तिने स्वतःला ‘श्रीमाताजीं’च्या हाती सोपवले पाहिजे आणि सेवेच्या, भक्तीच्या, अभीप्सेच्या माध्यमातून स्वतःला त्यांच्याप्रत खुले, उन्मुख केले पाहिजे. तेव्हा मग ‘श्रीमाताजी’ त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तीद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील, त्यामुळे मग साधना घडेल.

एक महान ‘पूर्णयोगी’ बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाच्या दिशेने मी कुठपर्यंत आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. ‘श्रीमाताजीं’ना समर्पित होणे आणि तुम्ही जे व्हावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी श्रीमाताजींनीच ठरवायच्या असतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणायच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151-152)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – १८२

आपल्या समग्र अस्तित्वाने सर्वथा आणि त्याच्या सर्व घटकांसहित, ‘दिव्य ब्रह्मा’च्या (Divine Reality) समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या वर्तमान अज्ञानमय आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची संपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे. तत्त्वत: आपण जे आहोत आणि आपल्या जीवात्म्यामध्ये जे ‘दिव्य ब्रह्म’ आहे त्याचे, आपण साधन व्हावे आणि त्याचे आविष्करण करावे म्हणून हे परिवर्तन आवश्यक असते.

विचारी मनाच्या मार्गाने किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती मुक्त करणे, हे पुरेसे नाही; एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ‘ईश्वरा’समवेत दीप्तिमान झालेच पाहिजे.

‘ईश्वरा’शी ऐक्य पावणे, ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’सोबत जगणे, ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकत्व पावणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 356-357)

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८०

श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानमय विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हेच केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे; या इहलोकामध्ये ‘ईश्वरा’चे आविष्करण घडविणे आणि ‘जडभौतिका’मध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना, बहुतेकांना तर तो अशक्यप्रायच वाटतो.

सर्वसाधारण अज्ञानमय विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या ध्येयाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती त्याला नाकारतात आणि त्या शक्ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरलेले आहेत. तुम्ही जर हे ध्येय अगदी अंतःकरणपूर्वक स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, त्या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभूतीद्वारे सापडण्याची काही आशा करता येईल.

‘पूर्णयोगा’ची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबंद मानसिक शिकवणुकीच्याद्वारे किंवा ध्यानधारणेच्या विहित प्रकारांद्वारे किंवा कोणत्याही मंत्रांद्वारे अथवा तत्सम गोष्टींद्वारे प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे आणि उपरोक्त सर्व गोष्टींना ज्या ज्या गोष्टी परक्या असतात त्या सर्व गोष्टींना नकार दिल्यामुळे ही साधना प्रगत होत जाते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 19-20)

साधना, योग आणि रूपांतरण – १७९

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी चेतनायुक्त ऐक्य आणि प्रकृतीचे रूपांतर हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. सर्वसाधारण योगमार्ग हे ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या निर्गुण स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याद्वारे, ऊर्ध्वमुख होत, ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलय पावण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतीत होणे आणि जे केवळ स्थितिमान स्थिरच आहे असे नाही, तर जे गतिमानही आहे अशा ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये प्रविष्ट होणे आणि समग्र व्यक्तित्व हे त्या ‘सत्या’मध्ये उन्नत करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)