साधना, योग आणि रूपांतरण – १९९
(नमस्कार, आजची पोस्ट थोडी विस्तृत आहे, पण ‘रूपांतरण’ म्हणजे काय ते नेमकेपणाने समजावे या दृष्टीने ती सलग वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे सलग देत आहोत.)
‘रूपांतरण’ (transformation) याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ म्हणजे प्रकृतीमध्ये थोडेसे परिवर्तन होणे असा नाही. उदाहरणार्थ, संतत्व किंवा नैतिक परिपूर्णत्व किंवा (तांत्रिकांना अवगत असलेल्या) योगसिद्धी किंवा चिन्मय देह असा कोणताच अर्थ मला त्यात अभिप्रेत नाही. मी ‘रूपांतरण’ हा शब्द एका विशिष्ट अर्थाने उपयोगात आणतो. यामध्ये ‘चेतनेमधील आमूलाग्र आणि संपूर्ण परिवर्तन’ अभिप्रेत आहे. हे परिवर्तन एका विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजे व्यक्तीच्या आध्यात्मिक उत्क्रांतीमध्ये एक भरभक्कम आणि खात्रीशीर पाऊल उचलले जाईल अशी संकल्पना यामध्ये अभिप्रेत आहे. मनोमय पुरुष जेव्हा प्रथमतः प्राणिक आणि भौतिक पशुजगतामध्ये उदयास आला तेव्हा उदयोन्मुख चेतनेची ही जी छोटीशी पण निर्णायक उपलब्धी होती त्याच्यापेक्षा ही प्रगती अधिक महान आणि अधिक उच्चतर अशी असेल, तसेच तिचा आवाका आणि परिपूर्णता ही अधिक विशाल असेल. याहून उणे काहीही घडून आले किंवा किमान त्या पायावर आधारित जर खरा आरंभ झाला नाही, त्याच्या परिपूर्तीच्या दिशेने काही मूलभूत प्रगती झाली नाही, तर माझे उद्दिष्ट पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. मी जीवनाकडून आणि योगाकडून जी अपेक्षा बाळगतो ती कोणत्यातरी संमिश्र आणि अनिर्णायक अशा आंशिक साक्षात्काराने पूर्ण होणार नाही.
साक्षात्काराचा प्रकाश म्हणजे ‘अवतरण’ (Descent) नव्हे. स्वयमेव साक्षात्कारामुळे व्यक्ती समग्रपणे रूपांतरित होईल हे अनिवार्य नाही. त्यामुळे वरच्या स्तरावर कदाचित चेतनेची काही उन्मुखता किंवा उन्नती किंवा विशालता घडून येईल आणि त्यामुळे ‘पुरुषा’मधील कशाचा तरी साक्षात्कार होईल परंतु प्रकृतीच्या भागांमध्ये मात्र कोणतेही आमूलाग्र परिवर्तन घडून येणार नाही. व्यक्तीला चेतनेच्या आध्यात्मिक शिखरावर साक्षात्काराचा थोडाफार प्रकाश लाभलेला असू शकतो पण निम्न स्तरावरील भाग मात्र पूर्वी जसे होते तसेच राहतात. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत.
खरे आणि संपूर्ण रूपांतरण होण्यासाठी आधी, प्रकाशाचे अवतरण हे केवळ मन किंवा त्याच्या एखाद्या भागामध्ये होणे पुरेसे नाही तर ते संपूर्ण व्यक्तित्वामध्ये म्हणजे अगदी शरीराच्या स्तरापर्यंत किंबहुना त्याच्याही खाली होणे आवश्यक असते. मनामध्ये अवतरित झालेला प्रकाश मनाचे किंवा त्याच्या एखाद्या भागाचे या ना त्या प्रकारे परिवर्तन करू शकेल किंवा त्याचे आध्यात्मिकीकरण करू शकेल परंतु त्यामुळे प्राणिक प्रकृतीमध्ये बदल होईलच असे नाही. प्राणामध्ये अवतरित झालेला प्रकाश प्राणिक गतिप्रवृत्तींचे शुद्धीकरण घडवून आणू शकेल आणि त्यांचा विस्तारदेखील करू शकेल किंवा प्राणमय पुरुषाला तो प्रकाश शांत आणि अविचल बनवू शकेल पण तो प्रकाश शरीराला आणि शारीरिक चेतनेला पूर्वीप्रमाणेच ठेवेल किंवा तो प्रकाश शरीराला तशाच जड अवस्थेत ठेवेल किंवा त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडूही शकेल.
आणि केवळ ‘प्रकाशा’चेच अवतरण होणे पुरेसे नसते तर, समग्र उच्चतर चेतनेचे म्हणजे तिची शांती, शक्ती, ज्ञान, प्रेम आणि आनंद या साऱ्याचे अवतरण होणे आवश्यक असते. एवढेच नव्हे तर, हे अवतरण ‘मुक्ती’साठी पुरेसे असेल पण ‘परिपूर्णते’साठी ते पुरेसे नसेल. किंवा आंतरिक अस्तित्वामध्ये महान परिवर्तन घडवून आणण्याइतपत ते पुरेसे असेल देखील, पण बाह्यवर्ती अस्तित्व मात्र तसेच अपरिपूर्ण, वेंधळे, आजारी किंवा काहीही अभिव्यक्त न करणारे असेच राहण्याची शक्यता असते.
अंतिमतः जोवर व्यक्तीचे अतिमानसिकीकरण (supramentalisation) होत नाही तोवर, साधनेच्या माध्यमातून घडून आलेले रूपांतरण हे परिपूर्ण असू शकणार नाही. आंतरात्मिकीकरण (psychisation) हे पुरेसे नाही, ती तर केवळ एक सुरुवात असते. आध्यात्मिकीकरण (spiritualisation) आणि उच्चतर चेतनेचे अवतरण देखील पुरेसे नसते, ती एक मधली अवस्था असते. अंतिम साध्यासाठी अतिमानसिक ‘चेतना’ आणि ‘शक्ती’चे कार्य घडणेच आवश्यक असते. एवढे सगळे साध्य करण्याची आवश्यकता नाही, जेवढे काही प्राप्त झाले तेवढे पुरेसे आहे, असे कदाचित एखाद्या व्यक्तीला वाटू शकते परंतु पृथ्वी-चेतनेला एक ना एक दिवस जी निर्णायक झेप घ्यायची आहे त्यासाठी ते पुरेसे नसते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 398-399)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025