साधना, योग आणि रूपांतरण – १९८
‘पूर्णयोगा’च्या विशिष्ट आध्यात्मिक संकल्पना आणि आध्यात्मिक तथ्यं अभिव्यक्त करण्यासाठी, ‘अतिमानस’ या शब्दाप्रमाणेच ‘रूपांतरण’ हा शब्द देखील मी स्वतः (विशिष्ट अर्थाने) वापरला आहे. आता लोकं त्या शब्दांचा वापर करू लागले आहेत आणि मी ज्या अर्थाने ते शब्द उपयोगात आणले होते त्याच्याशी अजिबात संबंध नसलेल्या अर्थाने लोकं ते शब्द वापरू लागले आहेत. ‘आत्म्या’च्या ‘प्रभावा’मुळे प्रकृतीचे शुद्धीकरण होणे हा ‘रूपांतरण’ या शब्दाचा अर्थ मला अभिप्रेत नाही. शुद्धीकरण हा आंतरात्मिक परिवर्तनाचा किंवा आंतरात्मिक-आध्यात्मिक परिवर्तनाचा (psycho-spiritual change) केवळ एक भाग असतो, या व्यतिरिक्त या शब्दाला अर्थाच्या इतरही अनेक छटा आहेत. ‘रूपांतरण’ या शब्दाला अनेकदा नैतिक किंवा नीतीविषयक अर्थ दिला जातो; मात्र मला अभिप्रेत असलेल्या हेतुशी त्याचा काहीही संबंध नाही.
‘आध्यात्मिक रूपांतरण’ या शब्दामध्ये मला काहीतरी चैतन्यपूर्ण असा अर्थ अपेक्षित आहे. (यामध्ये जिवाची केवळ मुक्ती किंवा त्या एकमेवाद्वितीय ईश्वराचा साक्षात्कार एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. या गोष्टी कोणत्याही अवतरणाविनासुद्धा साध्य केल्या जाऊ शकतात.) रूपांतरण या शब्दामध्ये, व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागाने, म्हणजे अगदी अवचेतनापर्यंतच्या (subconscient) भागानेसुद्धा स्थिर आणि गतिशील आध्यात्मिक चेतना धारण करणे अभिप्रेत आहे. ही गोष्ट, ‘आत्म्या’च्या प्रभावामुळे केली जाऊ शकत नाही. (कारण) आत्म-प्रभावामुळे मन आणि हृदयाचे शुद्धीकरण, प्रबोधन होऊ शकते आणि प्राणाची निश्चलता देखील प्राप्त होऊ शकते पण चेतना मात्र मूलतः जशी होती तशीच (त्याच अवस्थेत) सोडून दिली जाते. या सर्व भागांमध्ये स्थिर आणि गतिशील ‘दिव्य चेतने’चे अवतरण घडविणे आणि त्या चेतनेद्वारे, सद्यस्थितीतील चेतनेची जागा पूर्णपणे घेतली जाणे, असा ‘रूपांतरणा’चा अर्थ होतो.
ही दिव्य चेतना आपल्या मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये नव्हे तर, त्यांच्या वरच्या बाजूस निर्भेळ आणि अनावृत (unveiled) स्वरूपात आढळते. ही चेतना अवतरित होऊ शकते हा निर्विवादपणे अनेकांच्या अनुभवाचा विषय आहे. आणि माझा अनुभव असा आहे की, तिच्या संपूर्ण अवतरणाखेरीज (मन, प्राण आणि शरीरावरील) आवरण आणि (त्यामधील) भेसळ कोणीही दूर करू शकत नाही, आणि संपूर्ण आध्यात्मिक रूपांतरण प्रत्यक्षात येऊ शकत नाही…
रूपांतरण हे जसे ‘पूर्णयोगा’चे केंद्रवर्ती उद्दिष्ट आहे तसे ते इतर योगमार्गांचे केंद्रवर्ती उद्दिष्ट नाही, या मुद्द्याची मी येथे भर घालू इच्छितो. इतर योग, मुक्ती आणि पारलौकिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करण्याइतपतच शुद्धीकरणाची आणि परिवर्तनाची अपेक्षा बाळगतात. आत्म्याच्या प्रभावामुळे ती गोष्ट निःसंशयपणे साध्य होऊ शकते. आणि जर जीवनापासून आध्यात्मिक पलायनच करायचे असेल तर त्यासाठी, येथील जीवनाचे रूपांतरण घडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या, वरून खालपर्यंत, संपूर्ण प्रकृतीमध्ये होणाऱ्या नूतन चेतनेच्या संपूर्ण अवतरणाची अजिबात आवश्यकता नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 403-404)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…