साधना, योग आणि रूपांतरण – १२३

(पूर्वार्ध)

व्यापार-उदीम करण्यामध्ये काही गैर आहे, असे मी मानत नाही… तसे जर का मी समजत असतो तर आपला जो साधकवर्ग मुंबईत राहून पूर्व आफ्रिकेत व्यापार करत आहे त्या मंडळींनी त्यांचे व्यापारउदीम आहे तसेच चालू ठेवावेत म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन कसे देऊ शकलो असतो? तसे असते तर, सारे काही सोडून द्या आणि केवळ आध्यात्मिक प्रगतीकडेच लक्ष पुरवा असे आम्हाला त्यांना सांगावे लागले असते. ‘क्ष’ त्यांचा गिरणी-उद्योग सांभाळता सांभाळता, अध्यात्म-प्रकाशासाठी साधना करत आहेत, याची संगती मग आपण कशी लावू शकतो? त्यांचा तो गिरणी-उद्योग त्यांनी तसाच वाऱ्यावर सोडून द्यावा, चोरापोरांच्या हाती द्यावा आणि ध्यानधारणा करण्यासाठी एखाद्या आश्रमात जाऊन राहावे, असे मला त्यांना सांगावे लागले नसते का? राजकारणावर जशी माझी पकड होती तसा जर मी व्यापारउदिमामध्ये प्रवीण असतो तर, यत्किंचितही नैतिक किंवा आध्यात्मिक पश्चात्ताप न होता, मी व्यापारउदिम केला असता.

एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते. राजकारण हे काही नेहमीच चांगले स्वच्छ असते असे नाही, किंबहुना बरेचदा ते तसे नसतेच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले. युद्धालादेखील आध्यात्मिक कृती म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि काहीजणांना युद्धावर पाठविले. कृष्णाने अर्जुनाला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून प्रोत्साहन दिले. आता, ‘कृष्ण हा आध्यात्मिक नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही प्रतिवाद करणार आहात का?

कृष्ण तर याही पुढे जाऊन असे उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत पोहोचू शकतो. ब्राह्मण, क्षत्रिय यांच्याप्रमाणेच कृष्ण वैश्यधर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. कृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने योगसाधना करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 248-249)

श्रीअरविंद