साधना, योग आणि रूपांतरण – १२२
साधना, योग आणि रूपांतरण – १२२
(स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय नेत्याने, जे गीताप्रणीत योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी श्रीअरविंदांना विनंती केली होती की, आपल्याला मार्गदर्शन करावे. राजकीय जीवनाचा मार्ग सोडून नवीन कार्य हाती घ्यावे का असा प्रश्न त्यांनी श्रीअरविंदांना विचारला आहे. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)
तुम्ही तुमच्या कार्याची आणि जीवनाची जी दिशा निवडली आहे त्यामध्ये बदल करण्याची कोणतीच गरज नाही. जोपर्यंत ते कार्य म्हणजे तुमचा स्वभावधर्म आहे असे तुम्हाला वाटते किंवा तुमच्या आंतरिक अस्तित्वाने ते कार्य करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले असेल तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने, ते कार्य म्हणजे तुमचा विहीत धर्म आहे, असे तुम्हाला वाटते तोपर्यंत त्यात बदल करण्याची गरज नाही. हे तीन निकष आहेत. या व्यतिरिक्त गीताप्रणीत योगाने, आचरणाची कोणती एखादी निश्चित दिशा किंवा कर्माचा किंवा जीवनाचा कोणता मार्ग नेमून दिला आहे किंवा कसे ते मला माहीत नाही.
कार्य कोणत्या वृत्तीने वा कोणत्या चेतनेने केले जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याचे बाह्य रूप हे विविध स्वभावधर्मानुरूप बदलू शकते. ‘ईश्वरी शक्ती’ ने आपले कार्य हाती घेतले आहे आणि ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असा सुस्थिर स्वरूपाचा अनुभव व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असे चालू राहते; त्यानंतर कोणते कार्य करायचे किंवा कोणते कार्य करायचे नाही हे ती ‘शक्ती’च निर्धारित करते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 236)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025







