साधना, योग आणि रूपांतरण – ८४

(आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.)

एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, त्याच्या संभाव्यता या गोष्टी हाताळू लागते आणि ती ‘दिव्य शक्ती’च तुमची योगसाधना करू लागते.

आणि मग सरतेशेवटी, सीमा ओलांडण्याची वेळ येते. तेथे चेतना निद्रिस्त नसते किंवा तिच्यात घट झालेली नसते. कारण चेतना ही सदासर्वकाळ तेथे असतेच; फक्त आता ती चेतना बाह्यवर्ती आणि भौतिकातून निघून, बाह्यवर्ती गोष्टींना आपली द्वारे बंद करून घेते आणि अस्तित्वाचा भाग असणाऱ्या आंतरिक आत्म्यामध्ये आणि प्राणामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीशी मागे सरकते. आणि तेथे चेतना अनेकानेक अनुभवांमधून प्रवास करते. यामधील काही अनुभव हे जागृतावस्थेमध्ये सुद्धा जाणवले पाहिजेत, आणि तसे ते जाणवू शकतात. कारण, आंतरिक अस्तित्व अग्रभागी येणे आणि आंतरिक अस्तित्वाची आणि प्रकृतीची जाणीव होण्यासाठी चेतनेने अंतरंगामध्ये प्रविष्ट होणे, या दोन्हीही प्रक्रिया आवश्यक असतात.

अनेक कारणांसाठी चेतनेची ही अंतराभिमुख प्रक्रिया अपरिहार्य असते. अभिव्यक्त होण्यासाठी अगदी अंशतः प्रयत्नशील असणारे आंतरिक अस्तित्व आणि बाह्य साधनभूत चेतना यांच्यामधला जो अडथळा आहे तो अडथळा मोडून पडण्यामध्ये किंवा किमान तो दूर होऊन, त्यातून पलीकडे जात येण्यामध्ये तिचा (अंतराभिमुख प्रक्रियेचा) प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनंत समृद्ध संभाव्यतेबाबत आणि अनुभूतीबाबत एक सचेत जाणीव भविष्यामध्ये निर्माण व्हावी आणि लोकं ज्याला चुकीने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच मानतात, त्या छोट्या, अगदी अंध आणि मर्यादित शारीरिक व्यक्तिमत्त्वाच्या पडद्याआड अलक्षितपणे पहुडलेल्या नवीन अस्तित्वाची आणि नव्या जीवनाची जाणीव (त्या लोकांना) भविष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी तिचा प्रभाव कृतिशील असतो. (चेतनेने) अंतराभिमुख होत घेतलेली बुडी आणि या आंतरिक जगतामधून पुन्हा जागृतावस्थेमध्ये येणे या दरम्यान गहनतर, संपूर्ण आणि समृद्ध असणाऱ्या जाणिवेचा प्रारंभ होतो आणि ती जाणीव निरंतर विस्तार पावू लागते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217)

श्रीअरविंद