ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – ८२

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांमधील आवरण भेदण्याच्या प्रक्रियेसंबंधी आपण कालच्या भागात माहिती घेतली.)

ही आंतरिक प्रक्रिया अनेक प्रकारे घडू शकते. आणि संपूर्णपणे बुडी घेण्याच्या ज्या सर्व खुणा असतात त्या सर्व एकत्रितपणे आढळून येतील असा एक व्यामिश्र अनुभवदेखील कधीकधी येऊ शकतो. आपण कोठेतरी आतमध्ये जात आहोत किंवा खूप खोलवर जात आहोत अशी एक संवेदना त्यामध्ये असते. आंतरिक गहनतेच्या दिशेने प्रवास चालू असल्याची जाणीव असते; आणि बरेचदा एक स्थिरतेची, सुखद सुन्नतेची (numbness), आणि हातपाय जड झाल्याची जाणीव असते. वरून येणाऱ्या शक्तीच्या दबावामुळे चेतना, शरीरामधून निघून अंतरंगामध्ये वळत असल्याची ती खूण असते. त्या दबावामुळे शरीर हे आंतरिक जीवनासाठी (आवश्यक असणाऱ्या) एका अचल आधाराचे रूप घेते किंवा एक प्रकारच्या सुदृढ आणि स्थिर उत्स्फूर्त आसनाच्या स्थितीमध्ये येते. लाटा खालून वर डोक्यापर्यंत उसळत आहेत अशा प्रकारची एक जाणीव असते, आणि त्यामुळे बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक जागृतीचा अनुभव येतो.

आधारामधील (मन, प्राण, शरीर यातील) कनिष्ठ चेतना वर असणाऱ्या उच्चतर चेतनेस भेटण्यासाठी आरोहण (ascend) करत असते. तांत्रिक मार्गामध्ये ज्यावर खूप भर दिला जातो त्या कुंडलिनी जागृतीच्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती असते. कुंडलिनी शक्ती शरीरामध्ये वेटोळे घातलेल्या स्थितीत सुप्त असते आणि ती मज्जारज्जूद्वारे आरोहण करत जाते आणि चक्रांच्या माध्यमातून ब्रह्मरंध्राच्याही वर स्थित असणाऱ्या ‘ईश्वरा’ला भेटण्यासाठी ब्रह्मरंध्रापर्यंत जाते, या प्रक्रियेशी तो अनुभव समकक्ष असतो. आमच्या पूर्णयोगामध्ये, ही काही विशेष अशी प्रक्रिया नसते, तर समग्र कनिष्ठ चेतना ही कधी प्रवाहांच्या रूपात तर कधी लाटांच्या रूपात उत्स्फूर्तपणे वर उसळी मारत असते, तर कधीकधी ही प्रक्रिया कमी सघन असते. आणि दुसऱ्या बाजूने, ‘ईश्वरी चेतना’ आणि तिच्या ‘शक्ती’चे शरीरामध्ये अवरोहण (descent) होत असते. स्थिरता आणि शांती, ऊर्जा आणि शक्ती, प्रकाश, मोद आणि आनंद, व्यापकता आणि मुक्तता, आणि ज्ञान या गोष्टी जणू शरीरामध्ये वरून ओतल्या जात आहेत असा तो अवरोहणाचा अनुभव असतो. ‘ईश्वरी अस्तित्वा’चा किंवा ‘उपस्थिती’चा अनुभव येतो. कधीकधी यापैकी एखादा तर कधी त्यातील बरेचसे किंवा कधीकधी तर सर्वच एकत्रितपणे, असा अनुभव येतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 215-216)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

16 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago