योगाचा अर्थ
साधना, योग आणि रूपांतरण – ८१
आंतरिक पुरुष आणि बाह्यवर्ती चेतना यांच्यातील आवरण भेदणे ही योगसाधनेमधील एक निर्णायक प्रक्रिया असते. ‘ईश्वरा’शी ऐक्य हा ‘योगा’चा अर्थ आहे, त्याचप्रमाणे, प्रथम तुमच्या आंतरिक आत्म्याप्रति आणि नंतर तुमच्या उच्चतर आत्म्याप्रति जागृत होणे, म्हणजे अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख होणे असा देखील ‘योगा’चा अर्थ आहे. वास्तविक, या जागृतीमुळे आणि आंतरिक पुरुष अग्रस्थानी आल्यामुळेच तुम्ही ‘ईश्वरा’शी एकत्व पावू शकता. बाह्यवर्ती भौतिक, शारीरिक मनुष्य म्हणजे केवळ एक साधनभूत व्यक्तिमत्त्व असते आणि ते स्वतःहून, या एकत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. त्याला केवळ कधीकधी घडणाऱ्या (ईश्वरी) संपर्कांचा, धार्मिक भावनांचा, अपूर्ण सूचनांचा अनुभव येऊ शकतो. आणि या गोष्टीसुद्धा बाह्यवर्ती चेतनेकडून येत नाहीत तर त्या आपल्या अंतरंगी जे आहे त्याच्याकडून येतात.
(आवरण भेदण्याच्या) दोन परस्परपूरक प्रक्रिया असतात. एका प्रक्रियेमध्ये आंतरिक पुरुष अग्रभागी येतो आणि त्याच्या स्वतःच्या स्वाभाविक गतिविधींचा ठसा बाह्यवर्ती चेतनेवर उमटवितो; त्या गतिविधी बाह्यवर्ती चेतनेच्या दृष्टीने असाधारण आणि अस्वाभाविक असतात. बाह्यवर्ती चेतनेपासून स्वतःला आत ओढून, आंतरिक स्तरांमध्ये प्रविष्ट होणे, तुमच्या आंतरिक आत्म्याच्या जगतामध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या अस्तित्वाच्या झाकलेल्या भागांबाबत जागृत होणे ही झाली दुसरी प्रक्रिया. एकदा का तुम्ही (अंतरंगामध्ये) अशी बुडी घेतलीत की मग, तुम्ही योगमय, आध्यात्मिक जीवनासाठी आहात अशी मोहोर तुमच्यावर उमटविली जाते आणि ती कशानेही पुसली जाऊ शकत नाही. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 30 : 215)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026





