साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

श्रीअरविंद