साधना, योग आणि रूपांतरण – ३९
(पूर्णयोगांतर्गत साक्षात्कारामध्ये, स्वत:मधील ईश्वराचे दर्शन, विश्वगत ईश्वराचे दर्शन, विश्वातीत ईश्वराचे दर्शन या तीन साक्षात्कारांचा समावेश होतो. त्यातील ‘विश्वगत ईश्वराचे दर्शन’ घेण्याचा मार्ग श्रीअरविंद येथे सांगत आहेत.
श्रीअरविंदलिखित Synthesis of Yoga या पुस्तकामधील एक उतारा आणि नंतर त्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण)
…ही एकाग्रता ‘संकल्पने’वर आधारित असते. कारण या ‘संकल्पने’च्या माध्यमातून मनोमय पुरुष सर्व अभिव्यक्तीच्या अतीत उन्नत होतो; जे अभिव्यक्त झाले आहे त्याच्याप्रत तो उन्नत होतो; खुद्द ती संकल्पना ही ज्याचे केवळ एक साधन आहे अशा ‘सद्वस्तु’प्रत तो उन्नत होतो. ‘संकल्पने’वर एकाग्रता केल्याने, आपण आज जे आहोत ते आपले मानसिक अस्तित्व, आपल्या मानसिकतेच्या कक्षा ओलांडून खुले होते आणि त्या चेतनेच्या एका स्थितीप्रत, जिवाच्या एका स्थितीप्रत, सचेत-पुरुषाच्या शक्तीच्या स्थितीप्रत आणि सचेत-पुरुषाच्या परमानंदाप्रत येऊन पोहोचते. ती संकल्पना ज्याच्याशी संबंधित असते आणि ती संकल्पना ज्याचे प्रतीक असते, ज्याची गतिविधी आणि लय असते अशा सद्वस्तुप्रत ती येऊन पोहोचते.
*
(वरील उताऱ्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण…)
येथे वेदान्ती ज्ञानाच्या पद्धतीचे उदाहरण घेता येईल. यामध्ये ‘ब्रह्म सर्वत्र उपस्थित आहे’ या संकल्पनेवर व्यक्ती लक्ष केंद्रित करते आणि झाडाकडे, आजूबाजूच्या वस्तुमात्रांकडे, त्यामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि ते झाड किंवा ती वस्तू केवळ एक रूप आहे, या संकल्पनेनिशी पाहते. जर ती एकाग्रता योग्य प्रकारची असेल तर कालांतराने, व्यक्तीला तेथे एका अस्तित्वाची, एका उपस्थितीची जाणीव होऊ लागते आणि तेव्हा मग समोर दिसणारे झाड हे जणू एखाद्या बाह्य आवरणासारखे दिसते आणि त्यामधील अस्तित्व किंवा उपस्थिती हीच एकमेव वस्तुस्थिती असल्याचे व्यक्तीला जाणवू लागते. कालांतराने मग संकल्पना गळून पडते, आणि त्याची जागा त्या वस्तुच्या थेट दर्शनाने घेतली जाते. आता मग संकल्पनेवर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकताच उरलेली नसते, कारण व्यक्ती आता त्याकडे गहनतर चेतनेच्या साहाय्याने पाहत असते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संकल्पनेवर एकाग्रता करणे म्हणजे काही केवळ विचार करणे नसते, ते केवळ मननही नसते तर ती एकाग्रता म्हणजे त्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये केलेला आंतरिक निवास असतो.
– श्रीअरविंद (CWSA 23 : 321), (CWSA 29 : 305-306)
- साधना, योग आणि रूपांतरण – १६३ - November 14, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १६१ - November 12, 2024
- साधना, योग आणि रूपांतरण – १६० - November 11, 2024