साधना, योग आणि रूपांतरण – २६

(श्रीअरविंद येथे ध्यानाचे पारंपरिक मार्ग सांगत आहेत.)

तुम्ही विचारांना नकार देऊन विचार करणे थांबवू शकता आणि शांत अवस्थेमध्ये तुम्ही स्वत:चा शोध घेऊ शकता.

तीच गोष्ट तुम्ही – विचारांचे प्रवाहित होणे तसेच चालू ठेवून, त्यापासून स्वतःला अलिप्त करून – साध्य करू शकता. त्यासाठी आणखीही अनेक मार्ग आहेत.

‘क्ष’च्या पुस्तकामध्ये नमूद केलेली ही पद्धत मला अद्वैत-ज्ञानी मार्गाची पद्धत वाटते. यामध्ये व्यक्ती “मी म्हणजे हे शरीर नाही, मी म्हणजे प्राण नाही, मी म्हणजे मन नाही,” असे म्हणत शरीर, प्राण, मन यांच्यापासून विवेकाच्या साहाय्याने स्वतःला वेगळे करून पाहते. मन, प्राण आणि शरीर यांच्यापासून स्वतंत्र असणाऱ्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत व्यक्ती हे असे करत राहते. हा देखील ध्यानाचा एक मार्ग आहे.

प्रकृतीपासून पुरुषाला स्वतंत्र करणे हा देखील आणखी एक मार्ग आहे. यामध्ये व्यक्ती सर्व गतिविधींकडे साक्षीभावाने पाहते आणि ‘साक्षी चेतना’ या भूमिकेतून आपण त्या सर्व गतिविधींपासून स्वतंत्र असल्याचे जोपर्यंत तिला जाणवत नाही तोपर्यंत ती व्यक्ती प्रकृतीपासून पुरुषास स्वतंत्र करत राहण्याची प्रक्रिया करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 302)

श्रीअरविंद