आपण सर्व घटनांच्या बाबतीत मनाचे आणि आत्म्याचे समत्व राखले पाहिजे; मग त्या घटना दुःखद असोत वा सुखद, आपला पराभव होवो वा जय, आपल्याला मानसन्मान मिळो वा आपला अवमान होवो, आपली सत्कीर्ती होवो किंवा अपकीर्ती, आपल्याला सद्भाग्य लाभो वा दुर्भाग्य. कारण या सर्व घटनांमध्ये, सर्व कर्मांच्या आणि कर्मफलांच्या ‘स्वामी’ची म्हणजे ईश्वराची इच्छा कार्यरत आहे, तसेच प्रत्येक घटना ही त्या ईश्वराच्या विकसनशील आविष्कारातील एक पाऊल आहे, हे आपल्याला पाहता आले पाहिजे.
सर्व शक्तींमध्ये, त्यांच्या लीलेमध्ये, त्यांच्या परिणामांमध्येही तसेच सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि प्राणिमात्रांमध्येही त्या ईश्वराचे दर्शन घेण्याची अंतर्दृष्टी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्यासमोर तो ईश्वर स्वतःला आविष्कृत करतो. प्रत्येक अनुभव, दुःखभोग, आदी सर्व गोष्टी एका दिव्य घटनेकडे वाटचाल करत असतात; आणि आनंद व समाधान यांपेक्षा त्यांना काहीही उणे नको असते; वैश्विक वाटचाल चालू राहाण्यामधील हा एक आवश्यक दुवा आहे; ही वाटचाल समजावून घेणे आणि त्याला साहाय्य करणे, हे आपले काम आहे.
त्यांच्या विरोधात बंड करणे, त्यांचा धिक्कार करणे, त्यांच्या विरोधात ओरडणे या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या अप्रशिक्षित आणि अज्ञानी प्रेरणांचे आवेग असतात. अगदी इतर सर्व गोष्टींप्रमाणेच या बंडाचेही ईश्वरी लीलेमध्ये काही उपयोग असतात आणि एवढेच काय पण अशी बंडे आवश्यकही असतात, साहाय्यभूतही ठरतात, दिव्य विकासाला त्या त्या योग्य वेळी व योग्य दशेमध्ये त्यांची आवश्यकताही असते आणि तशीच त्यांची योजनाही केलेली असते; परंतु अज्ञानी बंडखोरीचे आंदोलन हे आत्म्याच्या बाल्यावस्थेशी किंवा त्याच्या अर्ध्या-कच्च्या पौगंडावस्थेशी निगडित असते.
प्रौढ आत्मा मात्र त्यांचा धिक्कार करत नाही, तर त्या गोष्टी जाणून घेण्याचा आणि त्यांच्यावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो; तो आरडाओरडा करत नाही, तर त्या गोष्टी स्वीकारतो किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्या परिपूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करतो; तो आतल्या आत बंड करत राहत नाही तर मिळालेला आदेश पाळण्याचा, त्याची परिपूर्ती करण्याचा आणि त्यात रूपांतरण घडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे आपण आपल्या स्वामीकडून, त्याच्याकडून आलेल्या सर्वच गोष्टी समत्वबुद्धीने ग्रहण केल्या पाहिजेत.
दिव्य विजयाची घटिका जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत यशअपयश या दोन्ही गोष्टी त्या दिव्य विजयाच्या मार्गावरील आवश्यक टप्पे म्हणून सारख्याच शांतपणे स्वीकारले पाहिजेत. ईश्वरी संकेतानुसार जर वेदना, दुःखभोग, अगदी तीव्र दुःख आपल्या वाट्याला आले असेल तर त्यावेळी आणि अत्यानंद आणि सुख अनुभवाला आले तरी त्यानेही हुरळून न जाता, आपले आत्मे, आपली मने, आपली शरीरे तशीच अविचल राहतील; अशा रीतीने उत्तम समतोल राखत, आपण धिमेपणाने आपला मार्ग चालत राहू; जोपर्यंत परमोच्च आणि वैश्विक आनंदामध्ये प्रवेश करण्याची पात्रता आपल्यामध्ये येत नाही आणि त्या अतिशय उन्नत, श्रेष्ठ अवस्थेसाठी आपली तयारी होत नाही तोवर, मार्गावर भेटणाऱ्या सर्व गोष्टींना सारख्याच स्थिरपणाने सामोरे जाऊ.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 225)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…