योग आणि मानवी नातेसंबंध – २३
सहानुभूतीपूर्वक आणि निःपक्षपातीपणे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, ते न्याहाळणे यामध्ये काही अपाय नसतो – मात्र उगाचच टिका करत राहणे, दोष शोधणे आणि इतरांची निंदानालस्ती करणे (बहुतांशी वेळा चुकीच्या पद्धतीने) यामुळे त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी देखील वाईट वातावरण तयार होते. आणि हा कठोरपणा आणि एवढी ठाशीव निंदानालस्ती कशासाठी? प्रत्येक व्यक्तीमध्ये तिचे स्वतःचे दोष नसतात का? मग असे असताना, दुसऱ्यांचे दोष पाहायचे आणि त्यांची निंदानालस्ती करायची यासाठी इतका उतावीळपणा कशासाठी बरे? कधीकधी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची पारख करावी लागते पण ती घाईघाईने किंवा छिद्रान्वेषी वृत्तीने करता कामा नये.
*
स्वतःच्या तशाच चुका कुशलतेने टाळायचे सोडून, लोकांनी काय करता कामा नये किंवा काय केले पाहिजे, हे सांगण्यामध्ये आणि त्यांच्या कामावर कठोर टिका करण्यामध्ये, माणसं नेहमीच अधिक तत्पर असतात. खरोखरच व्यक्तीला बरेचदा आपल्या स्वतःमध्ये असलेले दोष दिसत नाहीत, पण इतरांमधील दोष मात्र अगदी सहजतेने दिसतात. हे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात ते दोष मानवी प्रकृतीमध्ये सर्वत्र आढळून येतात आणि त्यांच्यापासून क्वचितच कोणाची सुटका होते. मानवी मन हे खरंतर स्वतःविषयी जागरूक नसते आणि म्हणूनच व्यक्तीने नेहमीच आपल्या स्वतःमध्ये काय आहे ते पाहणे, त्याचे निरीक्षण करणे आणि अधिकाधिक जागृत होणे, हे योगामध्ये आवश्यक असते.
*
प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, निःपक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’ च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ - December 7, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ - December 6, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ - December 5, 2025






