योग आणि मानवी नातेसंबंध – ०७
मानवी स्नेहसंबंधांचे मूल्य काहीही असले तरी त्याचे त्याचे स्वतःचे असे एक स्थान असते कारण दिखाऊपणापेक्षा खरेपणाला, अपूर्णतेपेक्षा पूर्णत्वाला, मानवापेक्षा ईश्वराला पसंती देण्याइतपत जोवर चैत्य पुरुषाची (psychic being) तयारी होत नाही तोवर, त्याला आवश्यक असणारे सारे भावनिक अनुभव, या स्नेहसंबंधांमधून त्याला मिळत असतात. चेतना जशी उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आवश्यकता असते; तसेच हृदयाच्या साऱ्या कृतीदेखील उच्चतर पातळीवर उन्नत होण्याची आणि त्यांचा पाया व त्यांचे स्वरूप बदलण्याची आवश्यकता असते. सारे जीवन आणि चेतना ही ईश्वरामध्ये सुप्रतिष्ठित करणे म्हणजे योग होय, त्यामुळे प्रेम व स्नेह यांची मुळेसुद्धा ईश्वरामध्ये रुजली पाहिजेत तसेच ईश्वराशी आध्यात्मिक व आंतरात्मिक एकत्व हे त्यांचे अधिष्ठान असले पाहिजे. इतर साऱ्या गोष्टी बाजूला सारून, प्रथमतः ईश्वराकडे पोहोचणे किंवा केवळ ईश्वराचाच शोध घेणे हा या बदलांच्या दिशेने घेऊन जाणारा सरळ मार्ग असतो. प्रेम हे अप्रीतीकडे किंवा थंड निर्ममतेकडे वळले पाहिजे असा याचा अर्थ नाही; तर त्यामध्ये आसक्ती असता कामा नये, असा याचा अर्थ आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 296-297)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025





