अमर्त्यत्वाचा शोध १६
…कदाचित मनुष्याच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो भीतीचा; ही भीती बहु-आयामी, अनेकरूपी, आत्म-विसंगत, अतार्किक, अविवेकी, बरेचदा युक्तिहीन असते. सर्व प्रकारच्या भीतींपैकी सर्वांत सूक्ष्म आणि सर्वांत चिवट अशी जर कोणती भीती असेल तर ती असते मृत्युची. या भीतीची पाळेमुळे अवचेतनेमध्ये (subconscious) खूप खोलवर रुजलेली असतात आणि तेथून ती उपटून काढणे ही गोष्ट सोपी नसते. अर्थातच ही भीती अनेक गुंतागुंतीच्या घटकांपासून बनलेली असते. या घटकांमध्ये : सुरक्षिततेची भावना असते; आणि चेतनेचे सातत्य खात्रीशीररित्या टिकून राहावे यासाठी त्याच्या संरक्षणाविषयीची चिंता असते; त्यामध्ये अज्ञातासमोर कच खाणे असते ; अदृश्य आणि अनपेक्षितपणातून उद्भवलेली अस्वस्थताही त्यामध्ये असते; आणि कदाचित या साऱ्यामागे, पेशींमध्ये खोलवर दडलेली अशी एक सहजप्रेरणा असते की, मृत्यू ही काही अटळ गोष्ट नाही आणि जर काही अटी पाळल्या तर त्यावर विजय प्राप्त करता येतो. परंतु खरे सांगावयाचे तर, विजय मिळविण्यामध्ये एक प्रमुख अडथळा हा या भीतीचाच असतो.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 82)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026






