हा बारा बाजू असणारा रेखीव असा एक प्रकारचा मनोरा आहे, जो वर्षातील बारा महिन्यांचे प्रतीक आहे. तो संपूर्णतया रिकामा आहे… शंभर-दोनशे लोक सामावू शकतील एवढी त्याची क्षमता असणे आवश्यक आहे. त्यानंतर, आतल्या बाजूला, (बाहेरून नव्हे) छताला आधार देणारे बारा स्तंभ असतील, आणि अगदी मधोमध, जिच्यावर चित्त एकाग्र करावयाचे अशी वस्तु असेल. आणि संपूर्ण वर्षभर, सूर्याने किरणांच्या रूपात आत प्रवेश करावा : ते प्रकाशाचे विकिरण (Diffusion) नसेल. सूर्याचा प्रवेश किरणांच्या रूपातच होईल, अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. त्यानंतर, दिवसाच्या घटिकेनुसार व वर्षातील महिन्याप्रमाणे, सूर्यकिरण फिरेल. दिशा बदलली तरीसुद्धा सूर्यकिरण थेट मध्यभागीच पडत राहतील अशा पद्धतीने त्यांना दिशा दिली जाईल. (छताच्या वरच्या अंगास तशी व्यवस्था करण्यात येईल) केन्द्रभागी, पृथ्वीगोलाला आधार देत असेल अशा पद्धतीने, श्रीअरविंदांचे प्रतीक (Symbol) असेल. हा पृथ्वीगोल स्फटिक-सदृश पारदर्शक गोष्टीपासून तयार करण्याचा प्रयत्न आपण करावयास हवा….. एक मोठा पृथ्वीगोल. मग लोकांना ध्यानासाठी आत सोडण्यात येईल. कोणतेही ठराविक स्वरूपाचे असे ध्यान असणार नाही, परंतु लोकांनी तेथे शांततेने आणि एकाग्र होऊन…शांतीमग्नतेत राहणे आवश्यक आहे.

हे स्थान शक्यतो अगदी साधेसे असेल. आणि तेथील जमीन.. (Flooring) आरामदायी असेल.

आणि मधोमध जमिनीवर माझे प्रतीक (Symbol) असेल. माझ्या प्रतीकाच्या मधोमध, चार भागांमध्ये एखाद्या चौरसाप्रमाणे, श्री अरविंदांची चार प्रतीके असतील; ती सरळ उभी असतील, आणि पारदर्शक पृथ्वीगोलाला त्यांनी तोलून धरलेले असेल, आधार दिलेला असेल, असे मला दिसले आहे.

(CWM 13 : 284-285)

(मातृमंदिर ज्या स्तंभावर उभारलेले आहे त्या चार स्तंभांचा अर्थ)

उत्तर दिशा – महाकाली
पूर्व दिशा – महालक्ष्मी
दक्षिण दिशा – महेश्वरी
पश्चिम दिशा – महासरस्वती

*

(मातृमंदिराच्या पायापासून सभोवती असलेल्या बारा भुयारी कक्षांचा अर्थ)

मन:पूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, चिकाटी, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, चांगुलपणा, औदार्य, समत्व (समभाव), शांती.

*

(मातृमंदिराच्या भोवती असणाऱ्या बारा उद्यानांचा अर्थ)

अस्तित्व, चेतना, परमानंद, प्रकाश, जीवन, शक्ती, ऐश्वर्य, उपयोगिता, प्रगती, तारुण्य, सुसंवाद, परिपूर्णत्व.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 226)

(मातृमंदिराच्या पायाचा चिरा बसवतांना माताजींनी दिलेला संदेश)

“दिव्यत्वाप्रत ऑरोविलची जी अभीप्सा आहे त्या अभीप्सेचे मातृमंदिर हे जिवंत प्रतीक ठरो.”

*

मातृमंदिर हे ऑरोविलचा आत्मा असेल.

जेवढ्या लवकर हा आत्मा येथे विराजमान होईल तेवढे ते प्रत्येकासाठी आणि विशेषेकरुन ऑरोविलवासीयांसाठी अधिक श्रेयस्कर राहील.

*

मानवाच्या पूर्णत्वप्राप्तीच्या अभीप्सेला, भगवंताने दिलेल्या प्रत्युत्तराचे प्रतीक बनणे ही मातृमंदिराची मनिषा आहे.

भगवंताशी झालेले ऐक्य, प्रगमनशील मानवी ऐक्याच्या रूपात अभिव्यक्त होत राहील.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 223-224)