जेव्हा मनाचे या पृथ्वीवर अवतरण झाले तेव्हा, या पृथ्वीच्या वातावरणात मनाचे आविष्करण होण्याचा क्षण आणि पहिला माणूस उदयाला येण्याचा क्षण, यांच्यामध्ये लाखो वर्षांचा काळ लोटला. आता मात्र अतिमानवाचा उदय होणे, ही गोष्ट अधिक जलद घडून येईल; कारण मानवाला आता त्या गोष्टीची एक प्रकारची धूसर कल्पना आहे, तो अतिमानवाचे आगमन अपेक्षित करत आहे. त्याला अतिमानवाच्या आगमनाची एक प्रकारे जाणीव असल्याने, तो त्याची अपेक्षा बाळगून आहे. पण माकडं मात्र मानवाच्या उदयाची अपेक्षा बाळगत नव्हती, त्यांनी तसा कधी विचारही केलेला नव्हता, कारण कदाचित त्यांना जास्त विचारच करता येत नव्हता. परंतु, मानवाने मात्र अतिमानवाचा विचार केलेला आहे आणि तो त्याची वाट पाहत आहे, त्यामुळे ते आता लवकर घडून येईल. पण लवकर म्हटले तरी, कदाचित हजारो वर्षे लागतील.
ज्या व्यक्ती आंतरिक दृष्ट्या तयार झालेल्या असतात, खुल्या असतात आणि उच्चतर शक्तींच्या संपर्कात असतात, अतिमानसिक प्रकाशाशी आणि चेतनेशी, ज्या व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात थेट व्यक्तिगत संपर्क असतो, त्या व्यक्तींना पृथ्वीच्या वातावरणातील फरक जाणवतो.
ज्याप्रमाणे समधर्मी व्यक्तीच दुसऱ्या समधर्मी व्यक्तीला ओळखू शकतात, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये असलेली अतिमानसिक जाणीवच केवळ, पृथ्वीच्या वातावरणामध्ये अतिमानस कार्यरत असल्याचे जाणू शकते. या किंवा त्या कारणाने ज्यांनी अशी आकलनशक्ती विकसित केली आहे, त्यांनाच ते दिसू शकते.
पण ज्यांना, आपल्या अगदी नजीक आत असणाऱ्या आंतरिक अस्तित्वाची साधी जाणीवदेखील नाही, आणि जे त्यांचा आत्मा कसा असतो, हेसुद्धा सांगू शकत नाहीत, ते पृथ्वीच्या वातावरणातील हा फरक समजून येण्याइतपत तयार नसतात. त्यांना त्यासाठी पुष्कळ मजल मारावी लागेल. कारण ज्यांची चेतना ही कमी-अधिक प्रमाणात केवळ बाह्यवर्ती व्यक्तित्वामध्ये म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्येच केंद्रित झालेली असते अशा व्यक्तींना अशा कोणत्याही गोष्टींची ओळख पटण्यासाठी, अशा गोष्टींनी काही वैचित्र्यपूर्ण आणि अकल्पित रूप घेतलेले, दिसावे लागते. तेव्हा मग ते अशा गोष्टींना चमत्कार म्हणतात. परंतु, शक्तींच्या हस्तक्षेपामुळे जे सातत्याने चमत्कार घडून येतात; परिस्थितीमध्ये, व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडून येतो आणि ज्याचा परिणाम हा दूरवर पसरलेला असतो अशाला ते चमत्कार असे संबोधत नाहीत; कारण येथे केवळ बाह्य रूप पाहिले जाते आणि ते खूपच स्वाभाविक वाटते. पण, खरे सांगायचे तर, घडणाऱ्या लहानात लहान गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याचे चिंतन केलेत तर, त्या चमत्कारसदृश आहेत असे म्हणणे तुम्हाला भागच पडेल.
– श्रीमाताजी
(CWM 08 : 126-127)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…