अत्यंत महत्त्वाच्या, एकमेवाद्वितीय म्हणता येईल अशा काळामध्ये, या भूतलावर जीवन जगण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे; अशा वेळी उलगडू पाहणाऱ्या घटनांकडे आपण केवळ पाहत बसणार का? आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत वा कौटुंबिक मर्यादांपलीकडे ज्यांचे हृदय धाव घेत आहे; ज्यांचे विचार, किरकोळ व्यक्तिगत आवडीनिवडी आणि स्थानिक आचार-संकेत यांच्या पलीकडे असणारे असे काही कवळू पाहत असतील; थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ज्यांना अशी जाण आहे की, ते त्यांचे स्वत:चे, त्यांच्या कुटुंबाचे किंवा अगदी त्यांच्या देशाचेही नाहीत; तर विविध देश, मानवजात यांच्या माध्यमातून जो ईश्वर अभिव्यक्त होत आहे त्याचे ते आहेत, अशा व्यक्तींनी खरोखरच, जागे झाले पाहिजे आणि त्यांनी येऊ घातलेल्या उषेच्या आगमनासाठी, मानवाच्या भवितव्यासाठी कार्य करण्याच्या कामास लागले पाहिजे…

नित्यनिरंतर-परिपूर्ण असलेल्या आत्म्याचे प्रकटीकरण, त्याचे उलगडत जाणे ह्यामध्येच अतिमानवतेचा मार्ग दडलेला आहे. मानव स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती देईल, तरी सर्व गोष्टी बदलून जातील, सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील.

जेव्हा मानवाला स्वत:ची प्रकृती सापडलेली असेल, जेव्हा तो खऱ्या अर्थाने ‘स्वयं’ झालेला असेल आणि जेव्हा असा हा आध्यात्मिक मानव, त्याच्या स्वत:च्या ह्या साक्षात्कारी जीवाच्या सत्याच्या आज्ञेचे उत्स्फूर्तपणे पालन करेल, तेव्हा आध्यात्मिक जीवनाची उच्चतर पूर्णता घडून येईल. पण ही उत्स्फूर्तता, पशुप्रमाणे उपजत किंवा अवचेतन नसेल, तर ती अंतर्ज्ञानात्मक आणि पूर्ण, समग्रतया चेतन असेल.

नव्या युगामध्ये मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील अशा व्यक्ती कोण असतील? तर ह्याचे उत्तर असे की, पशुमानवाचे ज्याप्रमाणे आत्यंतिक मनोमय मानवामध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर घडून आले होते, त्याप्रमाणे सद्यस्थितीतील मानवाचे आध्यात्मिक मानवामध्ये रूपांतर होणे किंवा उत्क्रांती होणे ही मनुष्यप्राण्याची सर्वाधिक गरज आहे आणि ही आध्यात्मिक उत्क्रांती हीच नियती आहे; हे ज्यांनी ओळखलेले असेल अशा व्यक्ती, मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील.

अशा व्यक्ती धर्माचे विविध प्रकार आणि त्याविषयीच्या श्रद्धा यांबाबतीत तुलनेने इतरांपेक्षा उदासीन असतील. त्यांच्या लेखी ‘आध्यात्मिक रूपांतरा’वरील श्रद्धा हीच एकमेव महत्त्वाची बाब असेल.

पण हे रूपांतर, कोणत्यातरी यंत्रणेने किंवा कोणत्यातरी बाह्य संस्थांच्या द्वारे घडून येऊ शकेल, असे समजण्याची चूक ते करणार नाहीत; तर ते प्रत्येक मनुष्याने आंतरिकरित्याच अनुभवणे आवश्यक आहे; अन्यथा ते रूपांतर वास्तवामध्ये कधीच उतरणार नाही, ह्याची त्यांना जाण असेल आणि ही गोष्ट ते कधीही विसरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 159, 165-166)

श्रीमाताजी