अतिमानस चेतनेचे आविष्करण घडवून आणण्याची प्रक्रिया अधिक त्वरेने व्हावे ह्यासाठी श्रीमाताजींवर आश्रमाचा सर्व कार्यभार सोपवून श्रीअरविंद एकांतवासामध्ये निघून गेले. श्रीअरविंदांनी काही मोजक्या लोकांना बोलावून सांगितले की, आता येथून पुढे लोकांना मार्गदर्शन करणे, मदत करणे हे सगळे काम श्रीमाताजी बघतील आणि त्यांच्या माध्यमातूनच लोक श्रीअरविंदांशी संपर्क ठेवू शकतील. त्यानंतर लगेचच, अचानकपणे गोष्टींना वैशिष्ट्यूपर्ण आकार प्राप्त झाला : एक अतिशय प्रकाशमय निर्मिती, तिच्या अगदी बारीकसारीक तपशीलानिशी तयार झाली; तेव्हा ईश्वरीय अस्तित्वांशी संपर्क प्रस्थापित होऊ लागले, अनेक अदभुत अनुभव आले; अतिशय विलक्षण असा अनुभव होता तो. त्या सुमारास घडलेल्या एका घटनेविषयी श्रीमाताजी सांगत आहेत. एके दिवशी मी नेहमीप्रमाणेच, काय घडत आहे ते सांगण्यासाठी श्रीअरविंदांकडे गेले. आणि कदाचित जे घडले होते त्याविषयी मी जरा जास्तच उत्साहाने सांगू लागले.

तेव्हा श्री अरविंदांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, “हो. ही अधिमानस निर्मिती आहे. खूप चांगल्या रीतीने तुम्ही कार्य केले आहे. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध होऊ शकाल: असे अनेक चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल; तुम्ही या पृथ्वीवरील सर्व घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…. पुढे ते हसतच म्हणाले, “ते एक फार मोठे यश असेल. पण ही ‘अधिमानसिक’ निर्मिती आहे. आणि आपल्याला पाहिजे असलेले यश ते हे नव्हे; आपल्याला ह्या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची प्रस्थापना करावयाची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी आत्ताचे मिळालेले हे यश कसे त्यागावयाचे हे समजायला हवे.”

त्यांनी असे सांगितल्यावर, माझ्या आंतरिक जाणिवेमुळे मला ते लगेच समजले. आणि अवघ्या काही तासांतच ती अधिमानसिक निर्मिती निघून गेली. आणि त्या क्षणानंतर आम्ही पुन्हा एका नव्या पायावर निर्मिती करण्यासाठी कंबर कसली.

– आधार : (Stories told by the Mother ll : 119-120) *

श्रीमाताजी