दुसऱ्यांबद्दल आपण जे काय बोलतो ते सर्व अनिष्ट, अयोग्य प्रकारच्या ‘वायफळ’ बोलण्यातच अंतर्भूत केले पाहिजे.
पालक, शिक्षक किंवा विभागप्रमुख या नात्याने दुसऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर नसेल, तर ते काय करतात वा काय करीत नाहीत याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य असता कामा नये. इतरांबद्दल बोलणे, त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कृतीविषयी तुमचे मत व्यक्त करणे, किंवा इतर लोक त्यांच्याबद्दल काय समजू वा बोलू शकतात ह्याचा पुनरुच्चार करणे हे तुम्ही टाळले पाहिजे.
तुमच्या कार्याचे स्वरूपच असे असू शकते की, त्यामुळे एखाद्या विशिष्ट खात्यात, हाती घेतलेल्या कामात किंवा सामुदायिक कामात काय काय घडत आहे याची माहिती वरिष्ठांना सांगणे हे तुमचे तेथे कर्तव्यच असते. पण, अशा वेळीही तुम्ही जे काही सांगाल ते फक्त त्या कार्याविषयीच असावे. त्यात व्यक्तिगत गोष्टींचा संबंध येता कामा नये. तुमचे बोलणे सर्वस्वी पूर्णतः वस्तुनिष्ठच असले पाहिजे. त्यात तुमच्या वैयक्तिक प्रतिक्रिया, पसंतीनापसंती, सहानुभूती किंवा विरोध या गोष्टी तुम्ही कधीही शिरू देता कामा नयेत. विशेषतः तुम्हाला नेमून दिलेल्या कामात क्षुद्र वैयक्तिक रागद्वेष तर कधीही मिसळू देऊ नका.
एकंदरीत, कोणत्याही प्रसंगी, सर्वसामान्य नियम म्हणून, दुसऱ्यांबद्दल, अगदी स्तुती करण्याकरता असले तरीही, तुम्ही जितके कमी बोलाल तितके अधिक चांगले. स्वत:मध्ये काय काय घडत आहे हे नेमकेपणाने जाणून घेणे हेच आधी कितीतरी कठीण आहे, तर मग दुसऱ्यांमध्ये काय काय घडत आहे हे तुम्हाला निश्चित कसे कळू शकणार? म्हणून कोणत्याही व्यक्तीबद्दल कसलेही ठाम मत व्यक्त करू नका. कारण, तसे करण्यात सूडबुद्धी नसली, तरीही तो एक मूर्खपणाच ठरेल.
ध्वनी आणि शब्द यांचा प्रभाव
शब्दांत ज्यावेळी एखादा विचार व्यक्त केला जातो, त्यावेळी त्या शब्दाच्या ध्वनीलहरीत इतके सामर्थ्य भरलेले असते की, त्यामुळे अगदी स्थूल द्रव्याशीही त्या विचाराचा संबंध जोडला जाऊन, त्याला प्रभावी, स्पष्ट व मूर्त स्वरूप प्राप्त होते. म्हणून कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल अमंगल असे तुम्ही कधीही बोलता कामा नये; किंवा या जगात होणाऱ्या ईश्वरी आविष्काराच्या कार्याच्या प्रगतीस विरोधी अशा कोणत्याही गोष्टी उघडपणे बोलता कामा नयेत. हा एक सर्वसामान्य नियम आहे.
पण त्यालाही एक अपवाद आहे. तुम्ही ज्या कृतीबद्दल किंवा गोष्टीबददल टीका करता, त्या गोष्टी नाहीशा करणारी किंवा पूर्णतः परिवर्तन करून टाकणारी जागृत शक्ती आणि सक्रिय इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी नसेल, तर कोणाही व्यक्तीची किंवा कोणत्याच गोष्टीची निंदा तुम्ही करता कामा नये. वास्तविक या जागृत शक्तीच्या आणि सक्रिय इच्छाशक्तीच्या ठिकाणी असे सामर्थ्य असते की, त्यामुळे जडाच्या ठिकाणी अमंगल, वाईट विचारलहरींचा प्रतिकार करण्याची, त्यांना नाकारण्याची आणि अंततः त्या सुधारण्याची कुवत निर्माण होते; आणि परिणामतः अशा अमंगल, वाईट विचारलहरींचे भौतिक पातळीवर प्रकट होत राहणे अशक्य होऊन जाते.
पण जो कोणी अतिमानस, विज्ञानमय क्षेत्रांत जगत असेल आणि ज्याच्या मानसिक शक्तींना आत्म्याचा प्रकाश आणि सत्याचे सामर्थ्य लाभले असेल, तोच मनुष्य केवळ हे कार्य संकट किंवा धोका उत्पन्न न होता करू शकेल.
अशा या ईश्वरी कार्यकर्त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पसंती-नापसंती किंवा आसक्ती नसते. त्याने स्वत:मधील अहंकाराचे सारे बंध तोडलेले असतात आणि या पृथ्वीवर घडून येणाऱ्या अतिमानसिक शक्तीच्या कार्याचे तो केवळ पूर्णपणे पवित्र आणि व्यक्तिनिरपेक्ष असे एक साधन झालेला असतो.
वादविवाद टाळले पाहिजेत
आपल्या कल्पना, आपली मते, आपण केलेल्या चिंतनाचे आणि अभ्यासाचे निष्कर्ष अभिव्यक्त करण्यासाठी म्हणूनदेखील काही शब्द उच्चारले जातात. या गोष्टी बौद्धिक क्षेत्रांतील आहेत आणि त्यामुळे असे वाटण्याचा संभव आहे की, या क्षेत्रांत मनुष्य अधिक तर्कशुद्ध आणि स्वयंनियंत्रित असल्याकारणाने या ठिकाणी वाक्संयमाच्या कडक तपस्येची तितकीशी जरुरी नाही. पण तसे मुळीच नाही.
कारण तसे पाहिले तर या वैचारिक आणि ज्ञानाच्या क्षेत्रांतही मनुष्याने आपल्या ठाम मतांचा अभिनिवेश, हेका, सांप्रदायिक असहिष्णुता आणि पसंती-नापसंती, आवेश या गोष्टी आणल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणीही तितक्याच कडक मानसिक तपस्येची अतीव आवश्यकता आहे. ज्याचा शेवट सामान्यतः नेहमी कटु आणि बहुधा निरर्थक वादविवादात होतो अशा विचारांची देवाणघेवाण टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे नेहमी संकुचित मनोवृत्तीतून निर्माण होणाऱ्या तीव्र मतविरोधांचा शेवट वादविवादात आणि कधीकधी तर भांडणांमध्ये होतो; हा तीव्र मतविरोध तुम्ही टाळला पाहिजे. मानसिक क्षेत्रांत पुरेशी उच्च दशा प्राप्त झाल्यावरच मतविरोधास कारणीभूत असलेली ही संकुचित मनोवृत्ती सुधारता येणे सहज शक्य असते.
कोणताही शब्दबद्ध विचार म्हणजे अनिर्वचनीय, अतिंद्रिय तत्त्व व्यक्त करण्याची केवळ एक रीत आहे, असे ज्याला समजेल, तो कधीच सांप्रदायिक होणार नाही. प्रत्येक कल्पनेत सत्याचा काही अंश असतो किंवा त्यात सत्याची एक बाजू असते. पण कोणतीच एकच एक कल्पना ही स्वयमेव संपूर्ण सत्य अशी नसते.
ह्या सापेक्षतेच्या जाणिवेमुळे, आपल्या बोलण्यात प्रसन्नतायुक्त समतोल व तारतम्य राखण्यास मदत होते. एका वयोवृद्ध गूढविद्यातज्ज्ञ बुद्धिमान व्यक्तीने काढलेले उद्गार मी एकदा ऐकले. ते म्हणाले : “जगात वास्तविक तत्त्वतः वाईट असे काहीच नाही. गोष्टी फक्त त्यांच्या योग्य जागी नाहीत एवढेच. प्रत्येक गोष्ट तिच्या यथायोग्य ठिकाणी ठेवा, म्हणजे सुसंवादपूर्ण जग तुम्हाला लाभेल.”
तरीहि कार्याच्या दृष्टीने पाहिले असता, एखाद्या कल्पनेचे मोल हे तिच्या ठिकाणी असलेल्या कार्यकारी शक्तीच्या प्रमाणात असते. ज्या व्यक्तीमध्ये हे कार्य घडून येते त्या व्यक्तिगणिक या कार्यकारी शक्तीमध्ये भिन्नता आढळून येते ही गोष्ट खरी आहे. एखादी विशिष्ट कल्पना जी एखाद्या व्यक्तीत खूप प्रेरणादायी ठरू शकते, तीच दुसऱ्या व्यक्तीत अगदी निष्फळही ठरू शकते. परंतु ही शक्तीच स्वतः स्वयमेव संक्रमणशील असते.
काही कल्पनांच्या ठायी जगाचे परिवर्तन करण्याची शक्ती असते. अशा कल्पना अभिव्यक्त केल्याच पाहिजेत. अध्यात्मरूपी आकाशात त्या एखाद्या मार्गदर्शक ताऱ्याप्रमाणे असतात; पृथ्वीस परम सिद्धी प्राप्त करून देण्याच्या कार्यात त्याच मार्गदर्शन करू शकतात.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 59-60)
साधना, योग आणि रूपांतरण – २२७ सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’…
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…