(श्रीमाताजींनी त्याच्या घडणीच्या काळामध्ये, तीव्र योगसाधना केली होती, त्या काळामध्ये त्यांच्या योगसाधनेचा एक मार्ग होता तो म्हणजे ‘प्रार्थना व ध्यान’. त्या काळामध्ये त्या रोज पहाटे ध्यानाला बसत असत आणि त्यातून प्रस्फुटीत झालेले विचार नंतर लिहून काढत असत, ते विचार पुढे Prayers and Meditations या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले. मुळात फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या यातील काही प्रार्थनांचे श्रीअरविंदांनी इंग्रजीत भाषांतर केले. या प्रार्थना योगसाधकांना मार्गदर्शक आहेत.)
१५.०६.१९१३ रोजी श्रीमाताजींनी केलेली प्रार्थना.
हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्याने, पारलौकिकाच्या वैभवाने मोहित होऊन, स्वत:च्या वैयक्तिक समाधानासाठी, तुझ्याशी एकत्व पावण्याची अहंभावी इच्छा तो बाळगतो, तेव्हा त्याने त्याच्या पार्थिव अस्तित्वाच्या मूळ कारणाकडेच पाठ फिरविलेली असण्याची शक्यता असते. ‘जडभौतिकाचे शुद्धीकरण आणि त्याचा उद्धार’ हे त्याचे जीवितकार्य पूर्ण करण्याला, त्याने एखाद्या भित्र्या माणसाप्रमाणे नकार दिलेला असू शकतो.
आपल्या अस्तित्वातील एखादा भाग हा संपूर्णतः शुद्ध झाला आहे हे जाणणे, त्या शुद्धतेशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी एकत्व पावणे हे सारे तेव्हाच उपयुक्त ठरू शकते, जेव्हा हे ज्ञान या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वरा करण्यासाठी, म्हणजेच तुझे उदात्त कार्य पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाते.
– श्रीमाताजी
(CWM 01 : 20)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025