ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

तपस्या म्हणजे आत्मपीडन नव्हे

तपस्या म्हणजे आत्मपीडन असा सर्वसाधारणपणे एक गैरसमज असतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती तपस्येविषयी बोलू लागते तेव्हा आपण तपस्व्याच्या कठोर शिस्तीचा विचार करतो. शारीरिक, प्राणमय, आणि मानसिक जीवनाचे आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे महाकठीण काम टाळण्यासाठी, असे परिवर्तन अशक्यच आहे असे तो तपस्वी प्रतिपादन करतो. आणि हे जीवन म्हणजे निरर्थक ओझे, एक बंधन आहे किंवा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक प्रगतीस पायबंद घालणारे आहे अशा भावनेने तो निर्दयपणे त्याला दूर लोटतो; निदानपक्षी, जीवन म्हणजे न सुधारता येणारी अशी एक गोष्ट आहे, प्रकृतिधर्मानुसार अथवा परमेश्वरकृपेने मृत्यूच्या माध्यमातून आपली जीवनातून सुटका होईपर्यंत कमी अधिक आनंदाने वाहिलेच पाहिजे असे ते एक ओझे आहे असे तो तपस्वी मानतो. किंवा फारतर, उन्नति करून घेण्याकरता ऐहिक जीवन हे एक क्षेत्र आहे म्हणून त्याचा व्यक्तीने जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे, व पूर्णतेच्या ज्या अवस्थेमध्ये ही जीवनपरीक्षा अनावश्यक ठरून तिचा अंत होईल अशा अवस्थेपर्यंत शक्य तितक्या लवकर जाऊन पोहोचले पाहिजे असे तो तपस्वी मानतो.

पण आपल्या दृष्टीने हा प्रश्न अगदी वेगळाच आहे. पृथ्वीवरील जीवन म्हणजे केवळ एक मार्ग किंवा केवळ एक साधन नाही, तर ‘रूपांतरित स्वरूपांतील जीवन’ हे आपले अंतिम उद्दिष्ट किंवा साध्य असले पाहिजे असे आम्ही मानतो. जेव्हा आम्ही तपस्या केली पाहिजे असे म्हणतो, तेव्हा शरीराचा तिरस्कार करून, त्याच्याशी असलेला संबंध तोडून टाकण्यासाठी नव्हे तर ‘आत्मसंयम आणि आत्मप्रभुत्व’ मिळविण्याची जरुरी आहे म्हणून तसे म्हणतो. कारण वर उल्लेख केलेल्या सर्व तपस्यांपेक्षा कितीतरी महान, अधिक पूर्ण आणि अधिक कठीण अशी एक तपस्या आहे.

ती तपस्या म्हणजे सर्वांगीण रूपांतरकार्यास आवश्यक असलेली, अतिमानसिक सत्याचा आविष्कार करण्यास व्यक्तीस पात्र बनविणारी चतुर्विध तपस्या.

या चार तपस्यांचे विवरण करण्यापूर्वी, बहुतेक लोकांच्या मनामध्ये बराच गैरसमज आणि गोंधळ उत्पन्न करण्यास कारणीभूत झालेल्या एका गोष्टीविषयी स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. ती गोष्ट म्हणजे तपस्व्यांच्या तपश्चर्येला लोक आध्यात्मिक योगसाधना मानतात ही होय. शरीराच्या बंधनांतून आत्म्याची सुटका करून घेण्यासाठी म्हणून शरीराला पीडा देण्याचे नाना प्रकार तपस्व्यांच्या तपश्चर्येत अंतर्भूत केलेले असतात. पण वास्तविक अशा तपश्चर्या म्हणजे आध्यात्मिक साधनेला जड इंद्रियांच्या पातळीवर आणून विकृत करण्यासारखे आहे. तपस्वी आत्मपीडनास प्रवृत्त होतो याचे कारण म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्मक्लेशाविषयी उत्पन्न झालेली विकृत गरज होय.

उघडपणे मान्य केलेले नसले किंवा तसे करणे शक्य नसले तरी साधूने खिळ्यांच्या शरशय्येचा केलेला अवलंब, किंवा स्वत:ला चाबकाने फटके मारून घेणे तसेच वस्त्र म्हणून गोणपाटाचा वापर करणे या पद्धती म्हणजे थोड्या फार प्रछन्न स्वरूपांतील ‘आत्मपीडनासक्ती’चाच परिणाम आहेत; अस्वास्थ्यकारक हाव किंवा तीव्र उग्र संवेदनांसाठी असलेली त्यांची ती एक सुप्त गरज असते. वास्तविक या गोष्टी खऱ्या आध्यात्मिक जीवनापासून फार पूर्वीच दूर करण्यात आल्या आहेत; त्या अज्ञानाधिष्ठित आहेत; शरीराला पीडा देणाऱ्या एक प्रकारच्या मानसिक आणि प्राणिक क्रूरतेने या गोष्टी शोधून काढल्या आहेत आणि प्रशंसनीय मानल्या आहेत.

पण स्वत:च्या शरीरासंबंधी असली तरी क्रूरता ती क्रूरताच. कोणत्याही प्रकारची क्रूरता ही गाढ अचेतनतेचीच एक खूण आहे. अचेतन प्रकृतीच्या लोकांनाच तीव्र संवेदनांची गरज भासते; कारण त्याशिवाय संवेदना त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. आणि क्रूरता हा एक परपीडनाचाच प्रकार असल्याने तो अतिशय प्रबळ संवेदना निर्माण करतो. आत्म्याकडे जी झेप घ्यावयाची आहे त्यामध्ये शरीराचा अडथळा येऊ नये म्हणून शरीराच्या सर्व संवेदना मारूनच टाकावयाच्या असा या तपस्यांमागील उघड उघड उद्देश असतो. पण याचा कितपत उपयोग होत असेल याविषयी शंकाच आहे.

ही गोष्ट सर्वमान्यच आहे की, मनुष्याला शीघ्र गतीने प्रगती करून घ्यावयाची असेल तर त्याने अडचणींना घाबरता कामा नये. उलट, प्रत्येक प्रसंगी अधिक कठीण गोष्ट निवडून तीच करावयास घेतल्याने मनुष्याची इच्छाशक्ति वाढते, त्याच्या मज्जातंतूचेहि सामर्थ्य वाढते. खरेतर, आध्यात्मिक जीवन हे प्रकाशमय आणि समतोल, सौंदर्यपूर्ण आणि आनंदमय जीवन असते.

सुखोपभोगातील अतिरिक्त लिप्तता व त्यातून येणारा अज्ञानांधकार यांच्याशी, संन्यस्तवृत्तीचा अतिरिक्त आग्रह व त्यातून येणाऱ्या अलिप्ततेच्या आधारे सामना करणे यापेक्षा परिमितता व समतोल युक्त, तसेच समचित्तता व प्रसन्नता यांमध्ये जीवन व्यतीत करणे कितीतरी अधिक कठीण आहे. शरीराला हीन वागणूक देत त्याचा विनाश करण्यापेक्षा स्वस्थचित्त राहत, साधेपणाने, शारीरिक अस्तित्वाचा सुसंवादपूर्ण व प्रगतीशील विकास साधणे ही गोष्ट खचितच अधिक अवघड आहे. आवश्यक असलेल्या पोषक आहारापासून, स्वच्छतेच्या आरोग्यदायी सवयींपासून शरीराला वंचित ठेवणे, आणि त्या संयमाबद्दल, त्याच्या निग्रहाबद्दल शेखी मिरविणे यापेक्षा समंजसपणाने व वासनारहित जीवन जगणे अधिक कठीण आहे. तसेच कोणत्याही आजारावर उपचार न करता केवळ दुर्लक्ष करून, त्याच्या विनाशकार्यास वाट मोकळी करून देणे यापेक्षा, निर्मलता व समतोलपणा आणि आंतरिक व बाह्य सुसंवाद राखून रोग होऊ न देणे, त्यातून पार पडणे किंवा त्याला जिंकणे हे अतिशय अवघड आहे. आपल्या जाणिवेची पातळी सतत शक्य तितक्या अत्युच्च शिखरावर ठेवणे आणि आपल्या शरीराला हीन उर्मीच्या प्रभावाच्या आहारी कधीही जाऊ न देणे ही गोष्ट वरील सर्व गोष्टींपेक्षा अधिक कठीण आहे.

वर उल्लेखिलेला हेतु डोळ्यांसमोर ठेवून आपण चार तपस्यांचा अंगीकार केला पाहिजे, म्हणजे परिणामी आपणास चतुर्विध मुक्ती प्राप्त होतील. त्यांचे आचरण करावयाचे तर खालील चार ‘तपस्यांचा’ किंवा ‘साधनापद्धतींचा त्यांत अंतर्भाव करावा लागेल. १) प्रेम-तपस्या २) ज्ञान-तपस्या ३) शक्ति-तपस्या ४) सौंदर्य-तपस्या

यातील क्रम श्रेष्ठ-कनिष्ठता, कमीअधिक अवघडपणा यांचा निदर्शक आहे असे मानू नये किंवा साधना ज्या क्रमाने करता येणे शक्य आहे आणि केली पाहिजे असा कोणताही क्रम त्यात अभिप्रेत नाही. त्यांचा क्रम, महत्त्व आणि अवघडपणा यामध्ये व्यक्तीनुसार फरक पडतो. म्हणूनच त्या बाबतीत कोणताच निरपवाद नियम ठरविता येणार नाही. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक क्षमतेनुसार व जरुरीनुसार आपल्या स्वत:ला योग्य अशी पद्धती शोधून काढून तिचे अनुसरण करावे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 48-49)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…

23 hours ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२५

साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…

2 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…

3 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…

4 days ago

चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण

साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…

5 days ago

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…

6 days ago