आमच्या साधनेची पार्श्वभूमी एका आदर्शाकडे निर्देश करते. हा आदर्श पुढील सूत्रात व्यक्त करता येईल.
ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर सर्वात्मक व सर्वातीत पुरुषाच्या जाणिवेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे.
सर्व प्रसंगी व सर्व जीवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; आपले आपल्याबरोबर आणि आपले ईश्वराबरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वत:मध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ईश्वरामध्ये पाहावे; आणि ईश्वर सर्वांमध्ये आहे, आम्हीही इतर सर्वांमध्ये आहोत ही जाणीव बाळगावी.
अहंभावात राहून नव्हे; तर ईश्वरात निमग्न राहून कर्म करावे. या ठिकाणी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवावयाची की, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक आदर्शाकडे लक्ष ठेवून कृतीची निवड करावयाची नाही; तर वरती जे जिवंत सर्वोच्च सत्य आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करावयाची.
दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक जाणिवेची बैठक पुरेशी तयार झाली म्हणजे मग, आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करावयाची नाही; तर आपल्या पलीकडे असलेल्या ईश्वरी इच्छेचे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्या प्रभावाने जी कृती आपल्या हातून घडेल, वाढेल ती तशी अधिकाधिक प्रमाणात घडू द्यावयाची, वाढू द्यावयाची.
शेवटी या साधनेचा श्रेष्ठ परिणाम : आपण स्वतःला उन्नत करून ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; ज्ञान, शक्ती, जाणीव, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; आपली क्रियाशीलता मृत्युवश मानवी वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नाही, तर ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकास पावत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करावयाची. आपल्यातील प्राकृतिक मानव दिव्य आत्म्याच्या आणि शाश्वत चैतन्याच्या जाणीवपूर्वकपणे आधीन केल्याने आणि विलीन केल्यानेच ही गोष्ट घडून येते. हे चैतन्यच विश्वप्रकृतीला मार्गदर्शन करत असते; ते कायमच तिच्या अतीत असते.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 101)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…