मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.
व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.
…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, मार्गदर्शक. जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्टी नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.
लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 24)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…