ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योगाविषयी योग्य दृष्टिकोन

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “माणसामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय.

जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आम्ही नजर टाकली तर असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे एक महान योग आहे – प्रकृती (निसर्ग) हा जीवनरूपी योग अभ्यासत आहे. आपले स्वत:चे पूर्णत्व गाठणे हा या प्रकृतीच्या मनातील उद्देश आहे; आपल्यातील विविध शक्ती सतत वाढत्या प्रमाणांत प्रकट करत, प्रकृती आपले पूर्णत्व गाठू इच्छिते. या योगाच्या आश्रयाने प्रकृती आपल्या दिव्य सत्य स्वरूपाशी गाठ घेऊ इच्छिते.

मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे एक साधन म्हणजे ‘योग’ होय.

प्रकृतिमाता तिच्या ऊर्ध्वगामी दिशेने चाललेल्या या प्रयासांमध्ये ज्या साधारण पद्धती अगदी सैलपणे, विपुलपणे आणि आरामशीर पद्धतीने, रमतगमत, सढळपणे उपयोगात आणत असते, त्यामध्ये वरकरणी पाहता, द्रव्याचा आणि ऊर्जेचा अपव्यय दिसत असला तरी त्यातून ती अधिक परिपूर्ण अशी संगती लावत जात असते, त्याच पद्धती योगामध्ये अधिक आटोपशीरपणे, अधिक तीव्रतेने, अधिक ऊर्जापूर्ण रीतीने उपयोगात आणल्या जातात. योगाची एखादी विशिष्ट प्रणाली म्हणजे त्या पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड वा दाबयुक्त संकोचन (compression) याशिवाय दुसरे तिसरे काही असत नाही. योगाविषयी हा दृष्टिकोन बाळगला तर आणि तरच, विविध योगपद्धतींच्या तर्कशुद्ध समन्वयास बळकट अधिष्ठान लाभू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 06)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

6 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago