भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)

अज्ञानमूलक चुका सुधारणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो; पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा प्रज्ज्वलित केलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा!… हे असे करणे म्हणजे, अंधकाराला हेतुपुरस्सर परत बोलावण्यासारखेच आहे.

-श्रीमाताजी
(CWM 09 : 306)

वाईट कालावधीचा अंत करण्यासाठी, अस्वस्थ होणे किंवा अधीर होणे हे खचितच उपयोगी पडणार नाही. उलट, तुम्ही थोडी जरी आंतरिक स्थिरता राखू शकलात तर, तुम्ही तुमच्या अडचणींमधून अधिक त्वरेने बाहेर पडाल. केवळ स्थिर अवस्थेमध्येच व्यक्ती स्वतःच्या आंतरात्मिक चेतनेच्या संपर्कात येऊ शकते.

श्रीमाताजी
(CWM 17 : 92)

आपले समग्र अस्तित्वच जेव्हा ‘ईश्वरा’च्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते तसेच ते अस्तित्व हातचे काहीही राखून न ठेवता, सर्व काही त्या ‘ईश्वरा’वर सोपविते, तेव्हा त्याला खरे समर्पण आणि प्रामाणिकपणा म्हणतात.

– श्रीमाताजी
(Mother You Said So: 02.03.1956)

विरोधी शक्ती माणसाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेत असतात, आणि केवळ म्हणूनच या जगात त्यांना सहन केले जाते. ज्या दिवशी मनुष्य संपूर्णतः प्रामाणिक बनेल, त्या दिवशी त्या निघून जातील, कारण तेव्हा त्यांना येथे अस्तित्वात राहण्यासाठी कोणतेच कारण शिल्लक उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 21)

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच मनुष्याला समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्याला सहन होत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 267)

प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, नि:पक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)