श्रीअरविंद घोष यांचा जन्म कलकत्ता येथे दि. १५ ऑगस्ट १८७२ मध्ये झाला.
इ.स. १८९० मध्ये ते इंडियन सिव्हिल सर्व्हिसची खुली परीक्षादेखील उत्तीर्ण झाले (इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या ग्रीक आणि लॅटिन भाषांच्या परीक्षेत तर ते सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाले होते.) परंतु ब्रिटिशांची चाकरी करायला नको, ह्या हेतूने घोडेस्वारीच्या चाचणीला ते स्वत:हून अनुपस्थित राहिले. त्या सुमारास बडोदा संस्थानचे अधिपती श्री.सयाजीराव गायकवाड लंडनमध्ये होते. बडोदानरेशांनी श्री. अरविंद घोष यांना आपल्या सेवेत रुजू करून घेतले आणि त्यासाठी श्रीअरविंद घोष यांनी जानेवारी १८९३ मध्ये इंग्लंडला रामराम ठोकला.
बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्या समवेत अरविंद घोष
इ.स. १८९३ ते १९०६ या तेरा वर्षांच्या कालावधीत श्री. अरविंद घोष हे बडोद्याला होते. आधी ते रेव्हेन्यू खात्यामध्ये, नंतर महाराजांच्या सचिवालयामध्ये कार्यरत होते. त्यानंतर ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये रुजू झाले. आणि सरतेशेवटी त्यांनी बडोदा कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारला. इंग्लंडमध्ये असताना, लहानपणी, त्यांच्या वडिलांच्या इच्छेनुसार, त्यांना जाणीवपूर्वकपणे भारतीय संस्कृती, तिची परंपरा, तिचा इतिहास, तिची मूल्ये यांपासून दूर ठेवण्यात आले होते; मात्र बडोद्याच्या कार्यकालामध्ये या सगळ्या गोष्टींचा त्यांनी कसून अभ्यास केला. वेदोपनिषदांचा अभ्यास केला. एक प्रकारे त्यांच्या भावी कार्याचा पायाच येथे रचला गेला. बडोद्याच्या वास्तव्यात ते संस्कृत आणि इतर भारतीय भाषा शिकले.
श्री.विष्णु भास्कर लेले
बडोदा येथील वास्तव्यामध्ये महाराष्ट्रीयन योगी श्री.विष्णु भास्कर लेले यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या मार्गदर्शनाने, योगाभ्यासाची सुरुवात झाली आणि अवघ्या तीनच दिवसात त्यांना मनाची निस्तब्धता ही अवस्था प्राप्त झाली. येथील वास्तव्यातील शेवटच्या दिवसांमध्ये ते गुप्तपणे राजकीय चळवळीमध्ये सहभागी झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने जो जनक्षोभ उसळला त्यादरम्यान त्यांनी बडोदा सेवेचा राजीनामा दिला आणि आता उघडउघड ते राजकीय चळवळीमध्ये सहभागी झाले. इ.स. १९०६ साली त्यांनी बडोदा सोडले आणि कलकत्त्याला नव्याने स्थापन झालेल्या बंगाल नॅशनल कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला.
इ.स. १९०२ ते १९१० हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा काळ होता. सुरुवातीचा काही काळ अतिशय शांतपणे ते आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यरत होते. लोकमान्य टिळकांच्या समवेत त्यांनी नॅशनल काँग्रेसमध्ये जहाल विचारधारा जोरकसपणे पुढे आणली. आणि अवघ्या दोन वर्षांमध्ये भारतीय राजकारणाचा चेहरामोहराच बदलून गेला. मवाळांच्या प्रांतिक स्वायत्ततेच्या सविनय मागणीला जहालांच्या संपूर्ण स्वराज्याच्या मागणीने छेद दिला.
कारागृहातील जीवनामध्ये त्यांनी योगाभ्यासाला वाहून घेतले होते. तेथेच त्यांना ‘वासुदेवः सर्वम् इति’ चा अनुभव आला आणि अधिक तीव्र योगाभ्यासासाठी त्यांनी स्वत:ला राजकीय चळवळीपासून दूर केले. ‘कर्मयोगिन्’ साप्ताहिकातील लेखनाच्या द्वारेही त्यांचा भारतीय जनमानसावर प्रभाव पडत होता. कर्मयोगिन मधील एका लेखासाठी त्यांना अटक होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. तेव्हा आंतरिक आदेशानुसार, फेब्रुवारी १९१० मध्ये ते चंद्रनगर येथे अज्ञातवासामध्ये गेले आणि तेथून पुढे ते फ्रेंच वसाहत – पाँडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास गेले. नॅशनल काँग्रेसचे नेतृत्व करावे अशी त्यांना वारंवार विचारणा होत असतानादेखील ते त्याकडे परतून आले नाहीत. अधिक उच्चतर अशा कार्यासाठी त्यांनी शक्तिवेच करावा असे स्पष्ट संकेत त्यांना एव्हाना प्राप्त झाले होते. आणि त्या आंतरिक आदेशानुसार इ.स. १९१० ते १९५० या कालावधीमध्ये पाँडिचेरी येथे आध्यात्मिक साधना व आध्यात्मिक कार्य करण्यामध्ये त्यांनी त्यांचे आयुष्य वेचले.
अतिमानसाचे अवतरण आणि त्याची पृथ्वीचेतनेमध्ये प्रस्थापना या कार्यासाठी त्यांनी इ.स.१९२६ मध्ये स्वत:ला वाहून घेतले. आपल्या साध्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी पूर्णयोग ही कर्म, ज्ञान,भक्ती तसेच हठयोग, राजयोग, तंत्रयोग यांच्या समन्वयावर आधारित असलेली योगसाधनेची पद्धत नेमून दिली. जीवनापासून पलायन नव्हे,तर जीवनामध्येच राहून, दिव्य जीवन आचरणे हे त्यांच्या पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. सर्व जीवन हा योग आहे ही त्यांची विचारसरणी होती. आजचा मानव हा अपूर्ण आहे आणि अधिक उच्चतर अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाने मन, प्राण आणि शरीर ह्यांचे रूपांतर घडून त्याला पूर्णत्व येईल अशी त्यांची विचारधारा होती. मानव हा उत्क्रांतीमधील अंतिम टप्पा नसून, अतिमानव उदयाला यावयाचा आहे हे त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीला जाणवले होते. आणि त्याला पोषक अशी परिस्थिती या पृथ्वीतलावर निर्माण करण्यासाठी श्रीअरविंद आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातील त्यांच्या सहयोगिनी श्रीमाताजी हे दोघे आयुष्यभर झटले. जडभौतिक ते अतिमानस या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाची रूपरेषा श्रीअरविंदकृत ‘सावित्री’ह्या महाकाव्याच्या निमित्ताने समोर आली. श्रीअरविंद आपल्या आध्यात्मिक अनुभूतीच्या आधारे अखेरपर्यंत ह्या महाकाव्याचे परिष्करण करत होते.
दि. ०५ डिसेंबर १९५० रोजी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनानंतरही ४ दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता,तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. या केंद्राभोवती, श्रीमाताजींनी उर्वरित आयुष्यात श्रीअरविंदांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला.
**
अधिक माहितीसाठी पाहा : मराठी विकिपीडियावरील श्री अरविंद घोष यांच्यावरील नोंद