भारताचे पुनरुत्थान – १०
‘बन्दे मातरम्’ या नियतकालिकामधून…
कलकत्ता : दि. २२ फेब्रुवारी १९०८
मनुष्याच्या अंतरंगामध्ये ईश्वराचे वास्तव्य असते (याचे प्रत्यंतर येणे) म्हणजे संपूर्ण साक्षात्कार आणि तोच समग्र धर्म आहे. जेव्हा भारताला (आद्य) शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य यांच्याकडून मिळालेल्या शिकवणुकीचे स्मरण होईल; श्रीरामकृष्ण (परमहंस) कोणते सत्य प्रकट करण्यासाठी आले होते याची जेव्हा भारताला जाणीव होईल तेव्हा भारताचा अभ्युदय होईल. वेदान्त हेच भारताचे जीवन आहे.
जो हिंदू आहे तो कधीच आपण (मानव) म्हणजे केवळ बौद्धिक जीव आहोत, असा विचार करणार नाही. ज्याने ईश्वर कधीच पाहिलेला नाही त्याने खुशाल बुद्धीचे गुणगान करावे, असे हिंदुधर्म मानतो. केवळ ईश्वराच्याच महानतेचे आणि तेजस्वितेचे गुणगान करावे असा आदेश त्या ईश्वरानेच हिंदुधर्माला दिला आहे आणि हिंदुधर्म हजारो वर्षे त्याचेच गुणगान करत आला आहे.
पहिल्यांदा जेव्हा कधी आपण युरोपियन शिक्षण स्वीकारले, तेव्हाच आपण विज्ञानाच्या (science) प्रकाशाने स्वत:ची दिशाभूल होऊ देण्यास संमती दिली. विज्ञान हा एका मर्यादित खोलीतील प्रकाश आहे, जग उजळवून टाकू शकेल असा सूर्य नव्हे. विज्ञानाची गोळाबेरीज म्हणजे अपराविद्या. पण त्याहून अधिक उच्च अशी एक विद्या आहे, महान असे एक ज्ञान आहे. जेव्हा आपण अपरा विद्येच्या प्रभावाखाली वावरत असतो, तेव्हा आपणच कर्ते आहोत अशा भ्रमात आपण वावरत असतो आणि जणू काही बुद्धीच सार्वभौम व सर्वशक्तिमान आहे असे समजून, आपण ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती बुद्धीच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हा भ्रामक आणि मायिक दृष्टिकोन असतो.
एखाद्याने एकदा जरी स्वत:च्या अंतरंगात वसलेल्या ईश्वराची दिव्य प्रभा अनुभवलेली असेल तर बुद्धी हीच सर्वोच्च असते, यावर तो पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. (बुद्धीपेक्षा श्रेष्ठ) एक उच्चतर आवाज असतो, एक अमोघ अशी आकाशवाणी असते. हृदयामध्ये ईश्वराचा अधिवास असतो. ईश्वर मेंदुद्वारे कार्य करतो, पण मेंदू हे त्याच्या अनेक साधनांपैकी एक साधन असते. मेंदू ज्या गोष्टीची योजना आखण्याची शक्यता असते, ती गोष्ट हृदयाला आधीच ज्ञात असते. आणि जो कोणी मेंदुच्या पलीकडे जाऊन, हृदयापर्यंत पोहोचू शकतो तोच शाश्वताची (Eternal) वाणी ऐकू शकतो.
– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 891-892)