भारत – एक दर्शन ०२
‘भारतीय’ संस्कृती आणि ‘युरोपीय’ संस्कृती यांच्यामधील भेदाचे मूळ हे आहे की, भारतीय सभ्यतेचे (civilisation) ध्येय ‘आध्यात्मिक’ आहे. या ध्येयाने भारतीय संस्कृतीच्या समृद्ध, विविध विलासी लय-रूपांना विशिष्ट वळण लावले आहे, त्यामुळे या संस्कृतीला तिचे अनन्यसाधारण स्वरूप आलेले आहे.
‘आध्यात्मिक अभीप्सा’ ही या संस्कृतीची शासक शक्ती होती, ही अभीप्सा हाच तिच्या विचारांचा गाभा होता आणि तीच तिची वर्चस्व गाजविणारी अभिलाषा होती. भारतीय संस्कृतीने आध्यात्मिकता हे जीवनाचे उच्चतम ध्येय ठरवले, एवढेच नव्हे, तर मानववंशाच्या भूतकालीन परिस्थितीमध्ये तिला शक्य झाले तितके सर्व जीवनच तिने आध्यात्मिकतेकडे वळविले.
परंतु धर्म हा मानवी मनातील आध्यात्मिक प्रेरणेचे पहिले आणि अपूर्ण असले तरी, स्वाभाविक रूप असल्याने व भारतीय संस्कृतीत अध्यात्मकल्पना प्रधान असून ती जीवनाची पकड घेत असल्याने, भारतीयांना आपला विचार व आचार धर्माच्या साच्यात घालण्याची आवश्यकता वाटली, तसेच जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये नेटाने, सातत्याने धार्मिक भावना भरण्याची आवश्यकता वाटली, त्यामुळे भारतीय संस्कृती ही व्यापक धार्मिक-तात्त्विक असण्याची अपेक्षा निर्माण झाली.
धर्ममते, पंथ यांची सत्ता ज्या कनिष्ठ पातळीवरील साधनामार्गांवर चालते त्या पातळ्यांपेक्षा उच्चतम आध्यात्मिकतेची पातळी खूपच वरची असते आणि ती एका मुक्त, व्यापक अवकाशात विहरत असते. आणि त्यामुळे साहजिकच ती धर्माने घालून दिलेल्या मर्यादा सहजासहजी सहन करत नाही. आणि जेव्हा कधी ती त्या मर्यादा मान्य करते तेव्हाही, उच्चतम आध्यात्मिक पातळी त्या मर्यादांच्या अतीत जाते. ती ज्या अनुभूतीमध्ये जीवन जगत असते ती अनुभूती औपचारिक धार्मिक मनाला दुर्बोध असते, अनाकलनीय असते. परंतु सर्वोच्च आंतरिक उंचीप्रत मनुष्य तत्काळ पोहोचू शकत नाही. आणि ही उंची त्याने एकदम गाठावी अशी अपेक्षा त्याच्याकडून बाळगली, तर तो तेथे कधीच पोहोचू शकणार नाही.
त्याला उन्नत होण्यासाठी प्रथम खालच्या आधारांची, पायऱ्यांची आवश्यकता असते. धर्ममत, पूजा, मूर्ती, चिन्ह, आकार, प्रतीक, अर्धवट स्वाभाविक मिश्र प्रेरणेची परवानगी व परिपूर्ती, या गोष्टींची, स्वतःच्या आंतरिक आत्म्याचे मंदिर बांधत असताना, आधार म्हणून, पायऱ्या म्हणून, उभे राहायचे स्थान म्हणून माणसाला आवश्यकता असते. हे मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतरच आधार वगैरे काढून घेता घेता येऊ शकतात, बांधलेले पाड (scaffolding) काढून टाकता येऊ शकतात. ‘हिंदुधर्म’ हे ज्या धार्मिक संस्कृतीचे नाव आहे त्या संस्कृतीने हा हेतू साध्य केला, एवढेच नव्हे तर इतर प्रचलित पंथांकडे जी जाण अभावानेच आढळते ती हेतुची स्पष्ट जाणही हिंदुधर्माला होती, असे दिसते. (आत्ममंदिराची उभारणी केली जात असताना आधार देणे हा धर्माचा हेतू आहे याची हिंदुधर्माला जाण आहे.)
हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव दिले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; त्याने मुक्तीचा कोणताही एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ‘ईश्वराभिमुख’ राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, ते शाश्वत धर्म, सनातन धर्म, हेच नाव स्वत:ला धारण करण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 178-179]