Posts

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी संघर्ष चालूच राहिला. फेब्रुवारी १९४६ साली, बंगाल आणि इतर प्रांतांमध्ये उसळलेल्या हिंदु-मुस्लीम दंग्यांमुळे ज्याची जटिलता अधिकच वाढली होती. भारताच्या स्वातंत्र्याविषयीच्या वाढत्या मागणीला दिलेला प्रतिसाद म्हणून, हा देश सोडून जाण्याचा इरादा असल्याचे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. दि. ०१ जुलै १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचे विधेयक संसदेमध्ये पारित करण्यात आले; त्या विधेयकानुसार, सत्तासूत्रे भारतीयांच्या हाती देण्याची तारीख दि. १५ ऑगस्ट १९४७ असेल, असे ठरले.

दि. १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस श्रीअरविंद यांचा ७५ वा वाढदिवस होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्यातील हा अंशभाग…

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस. हा भारतासाठी जुन्या युगाचा अंत आणि नव्या युगाचा प्रारंभ असणार आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर ती आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील महत्त्वाची आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

…या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी व्यक्तीश: मी उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे. कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ‘ईश्वरा’साठी, या जगतासाठी, अखिल मानव-वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे. ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी होती :

१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.
५) सरतेशेवटी, उत्क्रांतीची एक नवीन पायरी, जी चेतनेचे उच्चतर पातळीवर उन्नयन करून, त्याद्वारे ती – मानवांनी जेव्हापासून विचार करायला आणि व्यक्तिगत परिपूर्णतेची व एका परिपूर्ण समाजरचनेची स्वप्न पाहायला सुरुवात केली तेव्हापासून मानवजातीला अस्तित्वविषयक ज्या अनेकानेक समस्यांनी गोंधळात टाकले होते, अस्वस्थ केले होते – अशा समस्यांचे निराकरण करायला सुरूवात करेल. (क्रमश:)