(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण अव्यवहार्य नाही.” या विधानाचे अधिक स्पष्टीकरण करताना त्या म्हणतात.)
प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ द्यावयास हवी. त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही.
प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (कारण अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नव्हे, मला अस्तित्वच नाही.” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.
आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते कारण, मी तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, मनाचे ह्या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाची नव्हे तर, भौतिक मनाची ह्या प्राणतत्त्वाशी अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक तमुकशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्याच्याशी काहीही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते :
प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; पण कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.”
पण जर का हे प्रकरण फारच बळावले आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण चांगले वागणारे असतील आणि मला जे काय पाहिजे ते तेथे मला करता येईल.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात.
मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून संगनमताने ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली आहे. कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन. हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये पालटते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.
मी याठिकाणी वाईट वृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते : “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीयेत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील,” असे ते म्हणू लागतात. आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना अद्भुत कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून अजून एक!
निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात.
तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी असाच स्तब्ध राहीन.” तर फारच चांगले; कारण जर तुम्ही तसे केले नाहीत तर, तुमचे कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात धुळीस मिळतात.
(श्रीमाताजी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेतील काही भाग वाचतात आणि म्हणतात की, ‘याठिकाणी आता मी तुम्हाला एक दिलासा दिला आहे.” तो भाग असा -)
“ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी इतका पुरेसा संबंध प्रस्थापित केला आहे की, ज्यामुळे ते अभीप्सा-ज्योती व प्राप्तव्य ध्येयाची जाणीव जितीजागती ठेवू शकतात, त्या लोकांच्या बाबतीत असे आणीबाणीचे कसोटीचे प्रसंग फार काळ टिकत नाहीत. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही. (चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, ध्येयाविषयीच्या या जाणिवेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत जागृत होतो.
(श्रीमाताजी आता पुढे विवेचन करत आहेत) आणि आता हा अखेरचा दिलासा. जे कोणी अंत:करणाने खरेखुरे सच्चे आहेत, जे खरेखुरे सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुम्हावर असा आघात होईल, असे वादळ तुम्हामध्ये उठेल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नवीन प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल. ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे त्याला रूप येऊ शकेल.
अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, जर तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता जर तुमच्यापाशी असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही रोखून बघितलेत, अगदी जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल. त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 50-52)