Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २९७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही जे वर्णन केले आहे त्यावरून तुमच्यामध्ये अवचेतन (subconscient) अनियंत्रितपणे उफाळून वर आले आहे आणि सहसा शारीर-मन (physical mind) ज्या गोष्टींनी व्याप्त असते त्या गोष्टींचे म्हणजे जुने विचार, जुन्या आवडीनिवडी किंवा इच्छावासना यांच्या यांत्रिक पुनरावृत्तीचे रूप अवचेतनाने धारण केले आहे, असे दिसते. हे जर का एवढेच असते तर त्या गोष्टींना नकार देणे, तुम्ही त्यापासून निर्लिप्त होणे आणि त्या गोष्टी जाऊ देणे आणि त्या शांत होतील असे पाहणे, एवढे करणे पुरेसे होते. परंतु तुम्ही जे लिहिले आहे त्यावरून मला असे समजले की, तो एक हल्ला आहे आणि तुमच्या मनावर व शरीरावर आक्रमण करून, त्यांना त्रास देण्यासाठी अंधकारमय शक्तीने या पुनरावृत्तीचा वापर केला आहे.

ते काहीही असो, एक गोष्ट करा आणि ती म्हणजे तुमच्या अभीप्सेच्या (aspiration) साहाय्याने, श्रीमाताजींचे स्मरण करून किंवा अन्य मार्गाने, स्वतःला श्रीमाताजींच्या शक्तीप्रत खुले करा आणि श्रीमाताजींच्या शक्तीला हा हल्ला परतवून लावून दे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 605)

कर्म आराधना – ३८

कर्म करत असताना सुरुवातीला ‘ईश्वरी उपस्थिती’चे स्मरण ठेवणे हे सोपे नसते; परंतु कर्म संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कर्म करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 258-259]

कर्म आराधना – १९

केवळ एक सर्वसाधारण दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘दिव्य माते’ला अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जिवंत राहील.

काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कामामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीय’ ईश्वराचे स्मरण मात्र तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे.

ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन (surface mind) जेव्हा कर्म करत असते तेव्हा, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असेल, किंवा दिव्य ‘माते’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योग’साक्षात्कार आपोआपच नित्य घडू लागेल, कर्मामध्ये दिव्य ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २४

योगामध्ये सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला बरेचदा ईश्वराचे विस्मरण होण्याचा संभव असतो. परंतु सातत्यपूर्ण अभीप्सेने तुम्ही तुमचे स्मरण वाढविता आणि विस्मरण नाहीसे करून टाकता. पण एक कठोर शिस्त किंवा कर्तव्य या भावनेने ही गोष्ट घडता कामा नये तर ती प्रेम आणि आनंदाची (एक सहज) क्रिया असली पाहिजे. आणि मग लवकरच अशी एक अवस्था येईल की, तुम्हाला एका क्षणासाठी जरी ईश्वराचे अस्तित्व जाणवले नाही, तर मग तुम्ही काहीही करत असलात तरी तुम्हाला एकदम एकाकी, उदास, दुःखीकष्टी वाटायला लागते.

ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याशिवाय तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल आणि तरीही तुम्ही अगदी सुखी आहात असे जर का तुम्हाला आढळले तर, तुमच्या अस्तित्वातील ते अंग ईश्वराला समर्पित झालेले नाही, हे तुम्ही जाणले पाहिजे. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाची कोणतीच निकड भासत नाही अशा सामान्य मानवतेचा हा मार्ग झाला. परंतु दिव्य जीवनाच्या साधकाच्या बाबतीत मात्र ही गोष्ट काहीशी निराळी असते. जेव्हा तुमचे ईश्वराशी संपूर्णतया एकत्व झालेले असते तेव्हा, ईश्वर तुमच्यापासून क्षणभर जरी दूर झाला, तर तुम्ही अगदी मृतवत होता. कारण तो ईश्वरच आता तुमच्या जीवनाचे जीवन असतो, तोच तुमचे समग्र अस्तित्व असतो, तोच तुमचा एकमेव आणि संपूर्ण आधार असतो. जर ईश्वर नसेल तर मग काही शिल्लकच उरत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 26-27)

तुम्ही कोणत्यातरी अगदी क्रियाशील कृतीमध्ये गुंतलेले असाल उदा. बास्केटबॉल खेळणे, ज्यामध्ये खूप वेगवान हालचाली कराव्या लागतात. असे असतानादेखील, तुम्ही ईश्वरावरच्या आंतरिक ध्यानाचा आणि एकाग्रतेचा तुमचा भाव ढळू देता कामा नये.

आणि जर तुम्ही तसे करू शकलात तर तुम्हाला दिसेल की, तुम्ही जे काही करत असता त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली आहे; ती गोष्ट तुम्ही फक्त उत्तमच करता असे नाही, तर तुम्ही ती अगदी अपेक्षेपेक्षाही अधिक सामर्थ्यानिशी करता.

आणि त्याचवेळी तुम्ही तुमची चेतना इतक्या उंचीवर नेऊन ठेवता, इतकी शुद्ध राखता की, तुम्हाला तेथून पुढे कोणीच धक्का लावू शकत नाही. आणि लक्षात घ्या की हे इथपर्यंत होते की, एखादी दुर्घटना जरी घडली तरी ती तुम्हाला कोणतीही बाधा पोहोचवू शकत नाही.

अर्थातच, हे अत्युच्च शिखर आहे. ज्याची व्यक्तीने आस बाळगावी असे हे शिखर आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 121)