साधना, योग आणि रूपांतरण – २६८
(कालपर्यंत आपण मनाचे आणि प्राणाचे रूपांतरण समजावून घेतले. आजपासून आता शरीराच्या रूपांतरणाबद्दलचे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचार जाणून घेऊ या.)
शरीराचे रूपांतरण
तुम्हाला प्राणिक इच्छावासनांपासून मुक्त होण्यामध्ये खूप अडचण जाणवत आहे कारण आता साधना थेटपणे जडभौतिक, शारीरिक स्तरावर (physical plane) सुरू झाली आहे. येथे एखादी सवय जडली असेल किंवा एखादी गोष्ट सवयीची झाली असेल तर तिची ताकद खूप जास्त असते.
जेव्हा साधना मानसिक किंवा प्राणिक स्तरावर चालू असते तेव्हा प्राणिक इच्छावासनांवर नियंत्रण मिळविणे किंवा त्यामध्ये परिवर्तन घडविणे अधिक सोपे असते कारण शरीराच्या तुलनेत मन आणि प्राण हे अधिक घडणसुलभ (plastic) असतात.
परंतु दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येते की, जडभौतिकाच्या, शरीराच्या स्तरावर जर एखादी गोष्ट निश्चितपणे प्राप्त झाली असेल तर ती सिद्धी केवळ मानसिक किंवा केवळ प्राणिक स्तरावरील सिद्धीपेक्षा अधिक टिकाऊ आणि संपूर्ण असते.
*
शरीर आणि अवचेतनेमध्ये (subconscient) जेव्हा कार्य चालू असते तेव्हा ते कार्य मनामध्ये आणि प्राणामध्ये चालू असलेल्या कार्यापेक्षा नेहमीच अधिक संथ असते. कारण जडभौतिक द्रव्याकडून होणारा प्रतिकार हा नेहमीच अधिक जड, आणि निर्बुद्ध आणि कमी समायोजनक्षम (adaptable) असतो. परंतु जणूकाही त्याची भरपाई म्हणून, या संथ प्रक्रियेद्वारे व्यक्तीमध्ये जे कार्य केले जाते ते सरतेशेवटी अधिक संपूर्ण, अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असते.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 365, 365-366)