Posts

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचा एकांतवासाचा काळ हा त्यांच्या भरघोस साहित्यनिर्मितीचा कालखंड होता. श्रीअरविंद १९३० सालच्या सुमारास, साधकांना उद्देशून प्रचंड मोठ्या प्रमाणात पत्रलेखन करत होते पण त्याचबरोबर ते विपुल प्रमाणात काव्यनिर्मिती आणि गद्यलेखनसुद्धा करत होते. या कालखंडामध्ये त्यांनी अनेक कविता, विशेषतः सुनीतं लिहिली आहेत, आणि पाँडिचेरीला प्रारंभीच्या दिवसांपासून ज्या ‘सावित्री’ महाकाव्याच्या लेखनाची सुरूवात झाली होती, त्या लेखनाने आता वेग घेतला होता.

श्रीअरविंदांच्या जीवनाच्या उत्तरार्धातील बराचसा काळ श्रीअरविंद ‘सावित्री’ या महाकाव्याचे लिखाण करत होते. ‘सावित्री’चे पहिले हस्तलिखित उपलब्ध आहे ते इ. स. १९१६ मधील. सुरुवातीच्या काळात एक वर्णनात्मक कविता असे त्याचे रूप होते. पण नंतर त्यावर अनेकदा संस्करणे करण्यात आली. श्रीअरविंदांनी त्याला व्यापक आणि अधिक गहन अर्थ प्रदान करत, त्या काव्याचे महाकाव्यात रूपांतर करण्याचे कार्य १९३० च्या सुमारास पुन्हा एकदा हाती घेतले. ‘सावित्री – एक आख्यायिका आणि एक प्रतीक’, हे महाकाव्य म्हणजे त्यांची सर्वाधिक महत्त्वाची साहित्यकृती ठरली. या महाकाव्याच्या परिष्करणाचे काम ते त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत करत होते. इ. स. १९४० च्या सुमारास जेव्हा त्यांची शारीरिक दृष्टी साथ देईनाशी झाली तेव्हा, निरोदबरन या त्यांच्या निकटवर्ती साधकाच्या मदतीने त्यांनी हे लिखाण पूर्ण केले. १९४६ सालापासून त्यातील काही भाग प्रथमतः प्रकाशित होऊ लागले. ‘सावित्री’ या महाकाव्याच्या पहिल्या भागाची पहिली आवृत्ती १९५० साली प्रकाशित झाली. श्रीअरविंदांच्या हयातीमध्ये हा संपूर्ण ग्रंथ प्रकाशित होऊ शकला नाही. त्यांच्या महासमाधीच्या पुढल्या वर्षभरात दुसऱ्या खंडाच्या रूपाने तो समग्रपणे प्रकाशित करण्यात आला.

श्रीअरविंदांनी निरोदबरन यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये नमूद केले आहे की, “आरोहणाचे (ascension) एक माध्यम या दृष्टीने मी ‘सावित्री’चे लेखन केले. एका विशिष्ट अशा मानसिक स्तरावरून मी त्याच्या लेखनास सुरुवात केली होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचत असे तेव्हा तेव्हा त्या स्तरावरून मी त्याचे पुनर्लेखन करत असे… खरं सांगायचे तर, ‘सावित्री’ हे माझ्या दृष्टीने लिहून हातावेगळे करायचे काव्य नव्हे, तर व्यक्ती स्वतःच्या योगिक चेतनेमधून कोणत्या स्तरावरील काव्यनिर्मिती करू शकते आणि अशा प्रकारचे काव्य हे कसे सर्जक ठरू शकते, हा प्रयोग करण्याचे ते क्षेत्र आहे.”

…’सावित्री’चे सुमारे बारा वेळा पुनर्लेखन करण्यात आले. आणि या पुनर्लेखनाची दिशा डोक्याच्या वरील स्तरांकडे जाणारी होती. ‘अधिमानसिक’ (Overmind) काव्याच्या दिशेने चाललेला हा प्रवास होता.

१९३८ नोव्हेंबरमध्ये झालेल्या अपघातामधून श्रीअरविंद सावरू लागले होते, त्या कालावधीमध्ये ‘Life Divine’ (दिव्य जीवन) या ग्रंथाचे लिखाण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. १९३९ आणि १९४० सालांमध्ये दोन भागांमध्ये त्याच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर, Collected Poems and Plays, Vedic hymns to Agni, The Human Cycle and The Ideal of Human Unity, Sri Aurobindo’s Letters on yoga या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. परंतु एवढे प्रचंड लिखाण प्रकाशित होत असूनही, १९४० ते १९५० या दरम्यान त्यांच्या साहित्यनिर्मितीचा केंद्रबिंदू ‘सावित्री’ हाच होता. श्रीअरविंदांनी देह ठेवल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९५४ रोजी, ‘Savitri, a Legend and a symbol’ या ग्रंथाचे श्रीअरविंद आश्रमातर्फे प्रकाशन करण्यात आले. या महाकाव्यामध्ये २३८१३ पंक्ती (lines) असून, हे इंग्रजी भाषेतील सर्वांत मोठे दीर्घ-काव्य आहे.

श्रीअरविंद लिखित साहित्य आजवर ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्याची पृष्ठसंख्या २१५०० च्या आसपास आहे, त्यावरून त्यांच्या लेखनाचा आवाका लक्षात येईल. (क्रमश:)